करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भारतातील मशिदीही बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांचा हवाला देत एक ट्विट केलं आहे.

“जो पर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही,” अशा आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवबंदच्या मौलानांचंही आदित्यनाथ यांना पत्र
जावेद अख्तर यांच्या मागणीपूर्वी देवबंद स्थित दारूल उलूमचे मोहतमिम मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी उलूमच्या इमारतीला आयसोलेशन वॉर्ड करण्याची विनंती केली आहे. “संकटाच्या काळात देवबंद दारूल अलूम देशातील नागरिक आणि सरकारसोबत आहे. दारूल उलूमची ग्रँड ट्रंक रोडनजीक एक इमारत आहे. आवश्यकता भासल्यास सरकार त्या इमारतीचा आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापर करू शकते,” असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.