हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर बऱ्याच कलाकारांनी मोलाचे योगदान दिले आहे. अशाच काही कलाकारांच्या यादीतील अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन. महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर असंख्य भूमिकांना न्याय देत चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. बऱ्याच नवोदित कलाकारांसाठी बिग बी एक विद्यापीठच आहेत. या योगदानानाबद्दल ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘इफ्फी’द्वारे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

केंद्रीय माहिती व सूचना मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदाच्या ‘इफ्फी’त बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. फक्त चित्रपटसृष्टीतच नव्हे तर, सरकारच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. ‘स्वच्छ भारत’ अभियानासह विविध उपक्रमांसाठी बिग बींची ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदी निवडही करण्यात आली होती. त्यामुळे सामाजिक जनजागृती करण्यासाठीसुद्धा त्यांनी हातभार लावला असल्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.

वाचा : चित्रपट प्रेक्षकांसाठी करायचा की मंत्रालयासाठी ? : रवी जाधव

बिग बी सध्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होत आहेत. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकणार असल्यामुळे सिनेरसिकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. ‘यशराज फिल्म्स’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर चित्रपट ठरत आहे.