Jackie Shroff Expresses Concern Over Ambulance Traffic Issue : जॅकी श्रॉफ हे अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी नायकापासून खलनायकापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. जॅकी श्रॉफ वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतात. अशातच नुकताच सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
जॅकी श्रॉफ यांनी मंगळवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी लोकांवरचा राग व्यक्त केला. व्हिडीओमध्ये त्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पाहून आपली निराशा व्यक्त केली आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर एक रुग्णवाहिका अडकलेली पाहून जॅकी श्रॉफ यांनी एक व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले की, लोकांनी अधिक संवेदनशील असले पाहिजे किंवा रुग्णवाहिकांसाठी वेगळा मार्ग बनवला पाहिजे.
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की जॅकी श्रॉफ त्यांच्या गाडीत बसले आहेत. मुंबईत रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पाहून त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय, “जर रुग्णवाहिका अशीच अडकून राहिली, तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वेळेत कसं पोहोचवता येईल? तो रस्त्यावरच प्राण सोडेल. खरंतर, रुग्णवाहिकांसाठी वेगळा रस्ता बनवायला पाहिजे. शिवाय रस्त्यावर गाड्या चालवणाऱ्यांनी रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा हे समजलं पाहिजे; पण कोणाला काहीच पडलेलं नाही,” असं म्हणत जॅकी श्रॉफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
जॅकी श्रॉफ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होतात. जॅकी श्रॉफ हे बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नायकापासून खलनायकापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जॅकी श्रॉफ अलीकडेच ‘हंटर-२’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते, ज्यामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. प्रिन्स धीमान दिग्दर्शित या चित्रपटात सुनील शेट्टी, अनुषा दांडेकर आणि बरखा बिश्त यांच्याही भूमिका आहेत. तसेच ते ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या आगामी रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसण्यासाठी सज्ज आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे ही रोमँटिक जोडी दिसणार आहे.