देशभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. कलाक्षेत्रामधील मंडळींनी विविध पार्ट्यांना हजेरी लावली. तर राजकीय मंडळीही धुळवड साजरी करण्यात मग्न होते. अशामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांनीही धुळवड साजरी केली. अमृता फडणवीस यांनी यादरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. याबाबतच आता सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
अमृता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध सणांनिमित्त त्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसतात. आताही त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी त्यांनी एका वेगळ्याच अंदाजातील व्हिडीओ शेअर केला. होळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या खांद्यावर पोपट दिसत होता.

या व्हिडीओमध्ये अमृता त्यांची मुलगी दिवीजासह “हॅप्पी होली” बोलत आहेत. तर दोघींच्याही चेहऱ्यावर रंग दिसत आहे. अमृता यांनी त्यांच्या मुलीचा हात हातात पकडला आहे. यावरुन अमृता यांना बरंच ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत अमृता यांना सुनावलं. आता त्यांच्या याच व्हिडीओवर अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कमेंट केली आहे.
अमृता यांचा व्हिडीओ पाहून जॅकी म्हणाले, “आनंद”. अमृता यांचा हा व्हिडीओ जॅकी श्रॉफ यांना आवडला असल्याचं या कमेंटमधून दिसून येत आहे. यांना पेंग्विनचा त्रास आहे आणि यांनी पोपट पाळला का?, तुमच्या घरातील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा, मला वाटलं पोपट पण बोलेल अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी अमृता यांचा हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.