प्रियांका चोप्राचा देसी गर्ल स्वॅग अनुभवल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सेलिब्रिटी बापलेकाची जोडी येणार आहे. करणसोबत गप्पा मारण्यासाठी आणि त्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ येणार आहेत. जॅकी आणि टायगर यांच्या धम्माल गप्पांचा हा भाग येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पण, तत्पूर्वी या भागाचे काही प्रोमो स्टार वर्ल्ड इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘कॉफी विथ…’ च्या या भागाबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

या व्हिडिओमध्ये टायगर आणि जॅकी श्रॉफ यांच्या स्वभावामध्ये असणारी तफावतही पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी टायगर करणने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देताना संकुचित झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याउलट जॅकी श्रॉफ मात्र उघडपणे करणच्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे देत आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, करणच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असताना त्या उत्तरामध्ये जॅकी श्रॉफ यांनी वारंवार माधुरी दीक्षितच्याच नावाचा उल्लेख केला आहे. करणच्या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘रॅपिड फायर राऊंड’. करणने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना जॅकी श्रॉफ यांनी माधुरी दीक्षितचेच नाव वारंवार घेतले आहे. त्यामुळे धकधक गर्लने जॅकी श्रॉफ यांच्यावरही भुरळ घातली आहे असेच म्हणावे लागेल.

https://twitter.com/StarWorldIndia/status/823208626860920833

जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांनी ‘खलनायक’, ‘१०० डेज’, ‘राम-लखन’, ‘त्रिदेव’, ‘संगीत’ आणि ‘परिंदा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे करणच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना जॅकी श्रॉफ यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता नेमके माधुरीसोबत जॅकी यांचे नाते होते तरी काय? असा प्रश्न अनेकांनाच पडत आहे.

टायगर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत गप्पा मारत असताना करणने त्यांच्यासमोर काही खासगी प्रश्नांचा डोंगरही उभा केला. यावेळी करणने टायगरला विचारले की, ‘तु तुझ्या वडिलांसोबत कधीही सेक्सच्या विषयावर चर्चा करशील का?’, त्यावर टायगर म्हणाला, ‘ती काहीशी संकुचित करणारी परिस्थिती असेल’. करणच्या पेचात पाडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देत असताना टायगरने त्याच्या क्रशविषयीचाही उलगडा केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही टायगरची क्रश होती असे त्याने या कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता करणच्या प्रश्नांचा सामना ही बापलेकाची जोडी कशा प्रकारे करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.