जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दल प्रतिक्रिया दिली.

केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांचे आजोबा शाहीर साबळेंबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर केदार शिंदेंनी एक पोस्ट केली आहे. त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याबरोबर त्यांनी MaharashtraShaheer28April2023 महाराष्ट्रशाहीर MaharashtraShaheer असे हॅशटॅगही शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “आधीच सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलय अन् तुम्ही…” केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

केदार शिंदेंची पोस्ट

“My real Hero. #महाराष्ट्रशाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलत. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील. या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल रोजी जेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र या अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : “पण खंत एकच आहे की शिवसेनेचा…”, केदार शिंदे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्र शाहीर’ असे याचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.