हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला आणि ‘अवतार १’चेसुद्धा बरेच रेकॉर्ड त्याने ब्रेक केले. आता जेम्स कॅमेरून यांचा आणखी एक अजरामर चित्रपट पुन्हा प्रदर्शनासाठी तयार आहे. कॅमेरून यांचा ‘टायटॅनिक’ हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तब्बल १४ ऑस्कर मिळवणाऱ्या या चित्रपटात लिओनार्डो डीकॅप्रियो आणि केट विन्सलेट हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. ही प्रेमकहाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली अन् त्या जहाजाचा प्रवास लोकांसाठी फार अविस्मरणीय ठरला होता. आता पुन्हा हा चित्रपट नव्या रूपात ३डी मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही मोजक्याच चित्रपटगृहात हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं कौतुक पाहून ‘पठाण’चे चाहते म्हणाले, “बॉयकॉट करणाऱ्यांचं..”

चित्रपटाची २५ वर्षं आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचं जेम्स कॅमेरून यांनी स्पष्ट केलं आहे. १९ डिसेंबर १९९७ मध्ये ‘टायटॅनिक’ प्रदर्शित झाला होता. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, बेंगलोर या काही महत्त्वाच्या मेट्रो सिटीजमध्ये हा चित्रपट पुन्हा दाखवला जाणार आहे.

मुख्यत्वे या ४ शहरांतील आयमॅक्स थिएटर्स, पीव्हीआर स्क्रीन्स आणि इतर काही मल्टीप्लेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १०० ते १५० रुपयांपासून आयमॅक्समध्ये ९०० रुपयांपर्यंत तिकीटदर ठरवण्यात आला आहे. ज्यांनी तेव्हा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहिला नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.