बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘परम सुंदरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जान्हवीबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. दोन्ही स्टार सध्या ‘परम सुंदरी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान, शनिवारी (१६ ऑगस्ट) जान्हवीने दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावली. जिथे ती चाहत्यांच्या गर्दीत इतकी अडकली की, तिला गाडीपर्यंत पोहोचणेही कठीण झाले होते. त्यावेळचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत आहे.
खरं तर, जन्माष्टमीनिमित्त जान्हवी मुंबईतील एका दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यादरम्यान अभिनेत्री तिच्या आगामी ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या गेटअपमध्ये दिसली. तिने हलक्या क्रीम रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये चाहते दहीहंडी फोडताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये जान्हवीने तिच्या चाहत्यांशी मराठीत संवाद साधला. त्यामध्ये तिने चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आणि २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा तिचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट त्यांनी नक्कीच पाहावा, असे म्हटले.
मात्र, कार्यक्रमातून बाहेर पडताना जान्हवीला खूप अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा अभिनेत्री तिच्या गाडीकडे गेली तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अशा परिस्थितीत सुरक्षा कर्मचारी आणि तिच्या टीमने जान्हवीला गर्दीपासून दूर ठेवीत तिला गाडीत बसवले. त्यादरम्यान, अभिनेत्री खूप अस्वस्थ वाटत होती; पण तरीही ती हसून तिथून निघून गेली.
‘परम सुंदरी’बद्दल बोलायचे झाले, तर हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा (दिल्लीतील मुलगा) आणि जान्हवी कपूर (केरळमधील मुलगी) यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता आणि आता हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सिद्धार्थ आणि जान्हवीव्यतिरिक्त, राजीव खंडेलवाल व आकाश दहियादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.