हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘जारण’ चित्रपटाच्या चमूनेही संताप व्यक्त केला. ‘हे संपूर्ण प्रकरण विमनस्क करणारे आहे. वैष्णवी हगवणे कोणत्या त्रासातून गेली असेल, हे शब्दांत मांडताच येणार नाही. आपल्या जवळच्या नात्यात एवढी हिंसा असणे, याच्याहून मोठे भय आयुष्यात काही नाही. ज्या व्यक्तीवर प्रेम केले आहे, त्या व्यक्तीकडून छळ होणे, यापलीकडचे भय नाही, असे मत अमृता सुभाषने व्यक्त केले. तर किशोर कदम म्हणाले की, ही अत्यंत वाईट घटना असून अशा घटना आजही आपल्या समाजात घडतात, म्हणजे आपण अजूनही पुढारलेले नाही आहोत. आपण खूप चांगले ब्रँडेड कपडे घालतो, मोठमोठ्या गाड्या चालवतो, पण आपण आपल्या सुनांना अशी वाईट वागणूक देतो, ही अतिशय दयनीय सामाजिक परिस्थिती आहे. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली आहे, या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. आपण एक माणूस म्हणून किती बदललेलो आहोत आणि किती वेगळ्या पद्धतीने खालच्या पातळीवर गेलेलो आहोत, याचे उदाहरण म्हणजे हे प्रकरण आहे. आपण राजकारण्यांकडे समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतो आणि त्यांच्याच घरात अशी घटना घडते, ही अतिशय भयानक घटना आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘जारण’ चित्रपटाचे दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते यांच्यासह अमृता सुभाष, किशोर कदम, अनिता दाते या कलाकारांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत मनमोकळा संवाद साधत भयपटाशी निगडित रहस्यमयी गोष्टी उलगडल्या.

कौटुंबिक भयपट

‘जारण’ म्हणजे काळी जादू हे ट्रेलरवरूनच कळते आहे. मी कोकणात वाढलो आहे, पण महाराष्ट्र असो किंवा संपूर्ण भारतातील विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातील जारण, करणी, चेटूक अशा प्रकारच्या विविध घटना आपल्या कानावर सातत्याने पडत असतात. पण यापलीकडे जाऊन शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातूनही या गोष्टी ऐकायला मिळतात. ‘जारण’ चित्रपटाची कथा एका मुलीभोवती फिरते. या मध्यवर्ती पात्रावर लहानपणी करणी व जारणाचा प्रयोग झाला होता आणि त्यामुळे तिच्या आयुष्याची काय उलथापालथ झाली, याचे चित्रण करणारा हा भयपट आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा हा कौटुंबिक भयपट आहे, असे दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते यांनी सांगितले.

‘गंगूटी’ला पाहताच गूढ आणि भीती निर्माण होते’

मी जारणमध्ये ‘गंगूटी’ ही भूमिका साकारली आहे. गंगूटी ही नेमकी कोण व कशी आहे? याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. गंगूटी ही राधाच्या लहानपणापासूनची व्यक्ती असून ती राधाच्या मनात घर करून राहिलेली आहे. गंगूटीची भाषा व लूकमुळे तिच्याबद्दल आपसूकच गूढही वाटतं आणि भीतीही निर्माण होते, हे एकूणच वातावरण हृषीकेश गुप्ते यांनी निर्माण केले आहे. विविध ठिकाणी ग्रामीण भागांत निरनिराळ्या प्रथा व परंपरा आहेत. एकीकडे आपण देवाला मानतो, तर दुसरीकडे काहीजण गूढ विद्योलाही मानतात आणि त्यावर विश्वासही ठेवत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टी नेमक्या काय आहेत? ‘जारण’ ही भीती आहे की विधी आहे? याबद्दल विवेक मनामध्ये ठेवून नीट विचार केला, तर या सर्व गोष्टींमागे नेमके काय आहे? माणसाचे मन आणि मेंदू कसा आहे? हे सर्व ‘जारण’मध्ये जाणून घेता येणार आहे, असे अभिनेत्री अनिता दाते यांनी सांगितले.

‘भयाच्या मुळाशी वेदना असते’

एक प्रेक्षक म्हणून मला भयपट पाहण्याची भीती वाटते, पण जेव्हा दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते यांनी ‘जारण’ चित्रपटाची संहिता वाचून दाखविली, तेव्हा संबंधित भूमिका अनुभवण्याची इच्छा निर्माण झाली. कारण भय जेव्हा जन्म घेते, तेव्हा भयाच्या मुळाशी वेदना असते आणि ही भयाची वेदना चित्रपटाच्या अनुषंगाने खूप कमी दिग्दर्शक हेरतात. संहिता वाचली, तेव्हाच जाणवले की भयाच्या वेदनेपर्यंत जाणारा मार्ग मला दिसत असून त्यासाठी भूमिका जगावी लागेल. त्यामुळे एका विशिष्ट धाटणीच्या भयपटापलीकडे या चित्रपटाची संहिता वाटली. गुप्ते यांनी मला डोळ्यांसमोर ठेवून एक आव्हानात्मक भूमिका लिहिली, याचा आनंद आहे. हृषीकेशच्या कादंबऱ्या मी वाचल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्याशी फोनवर तासनतास बोलले, भयकथेवरची त्याची पकड मजबूत आहे, असे अभिनेत्री अमृता सुभाष यांनी सांगितले.

अभ्यासपूर्ण पद्धतीने चित्रपटाची निर्मिती

हृषीकेशच्या सर्व कादंबऱ्या मी वाचल्या असून त्या वाचून मी हरखून गेलो आणि त्याला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. मैत्री झाल्यानंतर आम्ही पुस्तके व चित्रपटांवर खूप गप्पा मारल्या. ज्या व्यक्तीने जागतिक स्तरावरची पुस्तके वाचलेली असतात, त्याने जागतिक चित्रपट नक्कीच पाहिलेला असतो आणि त्यानंतर या माणसाला चित्रपट करावासा वाटणे साहजिकच आहे. हृषीकेशने प्रचंड वाचून आणि पाहून अभ्यासपूर्ण पद्धतीने ‘जारण’ चित्रपट केला आहे, असे अभिनेता किशोर कदम यांनी सांगितले.

‘मनोरंजनाची व्याख्या हसण्यापुरती मर्यादित नाही’

स्वत:ला हसवून घेणे हाच मनोरंजनाचा प्रकार झालेला आहे, पण भयपटसुद्धा मनोरंजन करू शकतो. आपण चित्रपट पाहून झाल्यानंतर उदास होतो, चित्रपटाची कथा व पात्रे आठवडाभर मनातून जात नाहीत, या प्रकारचे चित्रपटही वेगळे मनोरंजन करणारे असतात. दु:ख मनोरंजन असू शकत नाही, पण दु:ख माणसाला समृद्ध करते. आपण मनोरंजनाची व्याख्या फक्त हसण्यापुरती मर्यादित करून ठेवलेली आहे, असे मला वाटते. ‘जारण’ हा भयपट एका वेगळ्या प्रकारचे मनोरंजन तुम्हाला देईल आणि चित्रपटातील पात्र, कथा आणि कोकणातील निसर्गरम्य स्थळ मनात घर करून राहील, असा विश्वास किशोर कदम यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शब्दांकन : अभिषेक तेली