बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आणि टीझर व्हिडीओ रिलीज केला.

मोशन पोस्टरमध्ये अक्षय आणि अर्शद एकत्र कोर्टरूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की हे मोशन पोस्टर कसे तयार केले गेले? आज (१३ ऑगस्ट) बुधवारी, अक्षय कुमारने या मोशन पोस्टरच्या शूटिंगचा बीटीएस व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र फोटोशूट करताना दिसतात आणि दोघांमधली मस्ती चाहत्यांना खूप आवडली आहे.

बीटीएस मोशन पोस्टरचा व्हिडीओ

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अर्शद वारसी आणि अक्षय कुमार लाकडी चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोन्ही कलाकार फ्रेममधून बाहेर पडण्यासाठी धडपडताना दिसत आहेत आणि या दरम्यान त्यांचे फोटोशूट सुरू आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी दोघांच्याही हातात एक फाईल आहे आणि अक्षय कुमार म्हणतो, “आम्ही क्लायंटला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.” व्हिडीओवरील जनतेची प्रतिक्रिया मजेदार आहे.

हा बीटीएस व्हिडीओ पोस्ट करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला या वेडेपणाचा शूटिंग व्हिडीओ पोस्ट करावासा वाटला, ज्याला आम्ही फिल्ममेकिंग म्हणतो.” हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये “दोघांची जोडी भारी”, “मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरता” अशा कमेंट्स केल्या आहेत.

‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी २’ हे दोन्ही चित्रपट चांगलेच गाजले. पहिल्या भागात अर्शद वारसीने काम केलं, तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने. याआधी ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी कोर्टरूममध्ये एकमेकांना चॅलेंज करताना दिसतात.

‘जॉली एलएलबी ३’मध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला यांच्याबरोबर हुमा कुरैशी, अमृता राव, अन्नू कपूर आणि सीमा बिस्वास यांच्याही भूमिका दिसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.