गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार नागाअर्जुनचा मुलगा नागाचैतन्य घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नागाचैतन्य किंवा समांथाने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. यानंतर नुकतंच सोशल मीडिया पोस्टद्वारे समांथाने घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे. या कठीण काळात चाहत्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आम्हाला एकांत द्याल, अशी विनंती त्यांनी केली आहे. नागाचैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर अभिनेत्री कंगना रनौतने मोठे वक्तव्य केले आहे.

कंगनाने नागाचैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर नुकतंच इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट करत भाष्य केले आहे. यावेळी तिने एका बॉलिवूड सुपरस्टारवर निशाणा साधला आहे. “बॉलिवूडमधील एका घटस्फोट तज्ज्ञामुळे या दोघांचा घटस्फोट झाला आहे,” असे कंगना म्हणाली.

कंगनाची प्रतिक्रिया

“जेव्हा जेव्हा घटस्फोट होतो, तो नेहमीच पुरुषाचा दोष असतो, असं म्हणण फार पूर्वीच्या व्यक्तींच्या मताप्रमाणे वाटू शकते. मात्र देवाने पुरुष आणि स्त्रीची निर्मिती अशाचप्रकारे केली आहे. त्यामुळे या लोकांवर दया दाखवणं बंद करा. काही पुरुष हे कपड्यांप्रमाणे स्त्रियांना बदलतात आणि त्यानंतर ते सर्वात चांगले मित्र असल्याचे सांगतात. त्यामुळे अशाप्रकारच्या १०० पैकी १ महिला चुकीची असू शकते. मात्र संपूर्ण नाही,” असे कंगनाने सांगितले.

यापुढे कंगना म्हणते, “ज्यांना प्रसारमाध्यम आणि चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळते, अशा लोकांचा धिक्कार असो. ते त्या पुरुषांची स्तुती करतात आणि महिलांना मात्र दोष देतात. हल्ली घटस्फोटाची संस्कृती पूर्वीपेक्षा अधिक वाढत चालली आहे.” असेही तिने म्हटले.

दरम्यान कंगनाच्या या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी घटस्फोट तज्ज्ञाबद्दल अनेक तर्कविर्तक लढवले आहे. यातील अनेकांनी हा घटस्फोट तज्ज्ञ अभिनेता आमिर खान असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतला होता.

काही दिवसांपूर्वी तो नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला गेला होता. आमिर खान आणि नागाचैतन्य हे दोघे लाल सिंह चड्ढा या चित्रपटात स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लडाखमध्ये होत आहे.

ऑक्टोबर २०१७ मध्ये विवाहबंधनात

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे.