दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. मंगळवारी इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. रिहानाने यावेळी शेतकरी आंदोलनावर कोणीही भाष्य करत नसल्याची खंत व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिहानाने आपण शेतकरी आंदोलनावर बोलत का नाही आहोत? अशी विचारणा केली आहे. सोबत तिने सीएनएनचं वृत्त दिलं आहे ज्यामध्ये दिल्लीच्या सीमेवरील भागात आंदोलन सुरु असणाऱ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दिल्लीतील आंदोलनस्थळी मंगळवापर्यंत इंटरनेटबंदी करण्यात आली होती. हरियाणातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेटबंदी बुधवारपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान रिहानाच्या या ट्विटवर अभिनेत्री कंगनाने उत्तर दिलं असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला असून ते देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी कंगना रिहानाला मूर्ख म्हणाली आहे. कंगनाने उत्तर देताना म्हटलं आहे की, “कोणीही यावर बोलत नाहीये कारण हे शेतकरी नाही तर दहशतवादी आहेत जे भारताची विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत”. यावेळी कंगनाने रिहानाला मूर्ख म्हणत आम्ही तुमच्याप्रमाणे देश विकायला काढला नसल्याचं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांची नाकाबंदी
नव्या कृषी कायद्यांविरोधात संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार पडसाद उमटत असताना दिल्लीच्या वेशींवरील आंदोलनस्थळी नाकाबंदी करण्यात आली आहे. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी सुरक्षा भिंती, तारेची कुंपणे उभारण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठय़ा खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. तारेची कुंपणंही उभारण्यात आली आहेत. पोलीस आणि निमलष्करी जवानांनीही आंदोलनस्थळांभोवती किमान चारस्तरीय कडे केले असल्याने आंदोलक शेतकऱ्यांची पूर्ण नाकाबंदी झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut international pop star rihanna farmers protest sgy
First published on: 03-02-2021 at 08:08 IST