Rishabh Shetty Kantara Chapter 1 Piracy : आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा: अ लिजेंड – चॅप्टर १’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवल्यानंतर दुसऱ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
‘कांतारा चॅप्टर १’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाला मात्र प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी पायरसीचं ग्रहण लागलं आहे.
इतर अनेक चित्रपटांप्रमाणेच ‘कांतारा चॅप्टर १’देखील पायरसीचा बळी ठरत आहे. अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात बसून व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत, जे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. याचबद्दल अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने भावनिक आवाहन केलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये असं म्हटलंय, “कांतारा ही गोष्ट सुरुवातीपासूनच तुमची आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच ही वाटचाल शक्य झाली. आम्ही नम्रपणे विनंती करतो की, कृपया पायरसीला साथ देऊ नका. यामुळे केवळ चित्रपटाचे नुकसान होत नाही, तर हजारो लोकांचे स्वप्न, मेहनत आणि परिश्रम वाया जातात. तसंच थिएटरमध्ये बसून व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करू नका, अगदी चांगल्या हेतूनं जरी करत असलात तरीही… ‘कांतारा – चॅप्टर १’ सिनेमा, त्यातील प्रत्येक दृश्य, प्रत्येक भावना तुम्ही थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठीच बनवलेला आहे.”
ऋषभ शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट
त्यामुळे ‘कांतारा चॅप्टर १’बाबत कोणीही पायरसी करू नये असं आवाहन निर्मात्यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचं झाल्यास, पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून तब्बल ६० कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये हिंदी व्हर्जनने सर्वाधिक १९.५० कोटी कमावले. पण पायरसीमुळे आता या कमाईवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पायरसी न करण्याचं आवाहन सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक करत आहेत.
