सध्या सोशल मीडियावर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगमी चित्रपट ‘शेरशाह’ची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कारगिल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात युद्धभूमीवर आपल्या अद्वितीय कामगिरीने शत्रूला गारद करणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या शौर्याची गाथा दाखवण्यात येणार आहे.

‘ये दिल मांगे मोअर’ हे आपल्याला एका शीतपेयाच्या कंपनीची टॅगलाईन म्हणून माहित आहे. पण या टॅगलाईनसाठी कॅप्टन विक्रम बत्रा हे देखील ओळखले जातात. कारगिल युद्धातील आपली कामगिरी पार पाडून बत्रा आपल्यासोबतच्या जखमी झालेल्या सैनिकांना घेऊन येत होते. त्यावेळी शत्रूने केलेल्या हल्ल्याचे ते लक्ष बनले. अवघ्या २४ व्या वर्षी हा तरुण सैनिक आपल्या साथीदारांना प्रेरणा देत होता. इतक्या लहान वयात देशासाठी प्राण देणाऱ्या या तरुणाची कहाणी हृदय हेलावून टाकणारी अशीच आहे.

विक्रम बत्रा यांनी त्यांचे शिक्षण चंदीगढमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिट्री अकादमीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात त्यांचा प्रवास लेफ्टनंट पदापासून सुरु झाला. हा प्रवास त्यांना कारगिल युद्धातील कॅप्टन पदापर्यंत घेऊन गेला. कारगिल युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मीर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धातील आपली कामगिरी पार पाडून बत्रा आपल्यासोबतच्या जखमी झालेल्या सैनिकांना घेऊन येत होते. त्यावेळी शत्रूने केलेल्या हल्ल्याचे ते लक्ष ठरले. शत्रूच्या एका गोळीने देशाचा हा जवान शहीद झाला. हिच कहाणी ‘शेरशाह’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युद्धाच्या दरम्यान कॅप्टन बत्रा शत्रूचा सामना करण्यासाठी स्वत:ला सज्ज करत होते. त्यावेळी बत्रा यांचे कमांडिंग ऑफीसर असलेल्या लेफ्टनंट कर्नल वाय.के.जोशी यांनी शेरशाह असे त्यांचे सांकेतिक नाव ठेवले. हे नाव पुढे पाकिस्ताननेही वापरण्यास सुरुवात केली. कॅप्टन बत्रा यांच्यासोबत युद्धभूमीवर असणाऱ्या जवानांच्या म्हणण्यानुसार, कॅप्टन बत्रा हे एक अतिशय उत्तम योद्धा होते. पॉईंट ५१४०, पॉईंट ४७५०, पॉईंट ४८७५ ही ठिकाणे शत्रूच्या तावडीतून काबीज करण्यात बत्रा यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपली कामगिरी सिद्ध केल्यानंतर विक्रम बत्रा आणि त्यांचे सहकारी ये दिल मांगे मोअरचा गजर करायचे. त्यामुळे युद्धभूमीवर सगळीकडून हा एकच नारा ऐकू येत होता. ७ जुलै १९९९ रोजी पॉईंट ४८७५ या ठिकाणी असलेल्या शत्रूच्या सैन्याला बत्रा यांनी ठार केले. मात्र त्याचवेळी भारतीय सेनेतील हा शूर योद्धाही शहीद झाला. ‘जय माता दी’ हे कॅप्टन बत्रा यांचे शेवटचे शब्द ठरले.