देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने शासनाने कडक निर्बंध लावले आहे. राज्यभरात लॉकडाउन लावण्यात आला असून लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशातच नेत्यांच्या आसपास होणाऱ्या गर्दीवरुन दिग्दर्शक केदार शिंदेने टीका केली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केदारने एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!”
यापूर्वीही त्याने देशातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. या स्टोरीमध्ये तो म्हणतो, “भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष….”
केदारने सोबत ऑक्सिजन सिलेंडरचा फोटोही पोस्ट केला आहे. सध्या देशात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना प्राणही गमवावे लागले आहेत. देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत असल्याने आता प्रशासन टीकेचा विषय बनलं आहे.