मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडत असते. तिच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे अनेकदा केतकीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. मात्र या वादग्रस्त वक्तव्यांमुळेत केतकीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. केतकी कायदेशीर कचाट्यात अडकली असून केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय. एका जुन्या प्रकरणात केतकी अडकली असून या प्रकरणी ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाली होती केतकी?

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा सोशल मीडियावरून शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणं, अनेक कारणांमुळे केतकी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. गेल्यावर्षी म्हणजेच केतकीनं १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

“महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे,” या केतकीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्ण जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketaki chitale in trouble as thane court denies pre arrest bail for her controversial statement about dalits kpw
First published on: 10-09-2021 at 17:10 IST