मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी एका जाहिरातीचं उदाहरण दिलं होतं. या जाहिरातीत अॅडल्ट स्टारचा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर आता अभिनेते किरण मानेंनी एक पोस्ट लिहिली आहे. किरण मानेंनी हंबरडे फोडणारी बांडगुळं म्हणत कलाकारांना प्रश्न विचारला आहे.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

खरंतर आत्ता सगळ्या कलाकारांनी प्यारल राज नयानीच्या बाजूनं उभं रहायची गरज आहे. पण तो ‘ठराविक’ टोळक्यातला नाही. आपल्या डबक्यातल्या एखाद्याला साधं ट्रोलींग झालं की गळे काढून हंबरडे फोडणार्‍या पोस्ट करणारी बांडगुळं, नेमकं जेव्हा आवाज उठवायची गरज असते तेव्हा थोबाड उचकटत नाहीत !

एक कलाकार विविध भूमिका करत असतो. त्याचा तो व्यवसाय आहे. प्याराली राज नयानी यानं ओरीजीनल शिवसेनेच्या एका जाहिरातीत काम केलं. ‘वॉर रूकवा दी पापा’ची भन्नाट खिल्ली उडवणारी ती जाहिरात होती. ती जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली. यामुळे पोटशूळ उठलेल्या सत्ताधार्‍यांनी चित्रा वाघ या भगिनीच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट या कलाकाराचं चारीत्र्यहनन केलं ! त्यानं एका वेबसिरीजमध्ये केलेल्या एका सिनचा फोटो प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवून “हा पॉर्न फिल्ममध्ये काम करणारा नट आहे.” असा आरोप केला. जो आरोप धादांत खोटा आहे.

हे पण वाचा- “हुकूमशाही नाकारताना घराणेशाही स्वीकारली तर चालेल काय?” युजरच्या प्रश्नावर किरण माने म्हणाले, “चालेल, ज्यांना…”

बेधडक असे खोटे आरोप करताना यांना लाजा कशा वाटत नाहीत, ते ‘राम’ जाणे ! अशावेळी या कलाकारांवर, त्यांच्या कुटुंबावर, बायको-मुलांवर, वयोवृद्ध आईवडिलांवर काय आघात होतात याचा थोडासुद्धा विचार केला जात नाही?? एवढी माणुसकी मेली आहे???

..अशा गंभीर प्रसंगाच्या वेळी मराठी कला क्षेत्रातून आपल्या कलावंत बांधवाला सपोर्ट करणारा एकही आवाज उठत नाही, याचे मला नवल वाटत नाही. कारण मला माहिती आहे, काही अपवाद वगळता एकजात भेकडांनी आणि लाळघोट्यांनी भरलेली मराठी इंडस्ट्री आहे. फक्त आपल्या कंपूतल्या कुणाला मुंगी चावली तरी वाघानं फाडल्यागत बोंबाबोंब करण्यात हे माहिर आहेत. अर्थात यातही काही अपवादात्मक निर्भिड कलावंत आहेत त्यांच्याविषयी आदर आहेच.

“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत

एका कलावंतावर असे घृणास्पद आरोप करणार्‍यांचा मी निषेध करतो. सत्ताधार्‍यांच्या दबावाला न जुमानणारा एखाददुसरा कुणी खराखुरा ‘सिंघम’ अधिकारी शिल्लक असेल तर त्याने असे आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी. प्यारल राज, मी तुझ्या बाजूने उभा आहे.

किरण माने.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी पोस्ट किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. आता यानंतर लोक यावर विविध कमेंटही करत आहेत. या पोस्टला भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? किंवा कुणी कलाकार यावर व्यक्त होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.