‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर येत आहे. किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. ३० मार्च रोजी किरण मानेंच्या वडिलांचे निधन झाले असून वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांच्या आठवणीत किरण मानेंनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. किरण मानेंनी आपल्या इन्स्टाग्रामवर वडिलांबरोबरचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “दादांनी माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला. माझी खूप धावपळ सुरू होती. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला. नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटने पुणे विमानतळावर उतरलो. दुसर्‍या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर साताऱ्याला जाऊ या विचारानं मी नाशिकसाठी निघालोच होतो. पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला.”

यापुढे त्यानी म्हटलं की, “गुढीपाडव्याच्या दिवशी साताऱ्याला घरी तीन-चार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि साताऱ्याला आलो. दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, “दादा आज लगेच मी नाशिकला चाललो आहे” तर ते काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की ‘शेजारी बस.’ मी बसलो. पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले. माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला.”

(फोटो सौजन्य : किरण माने इन्स्टाग्राम)
(फोटो सौजन्य : किरण माने इन्स्टाग्राम)

किरण मानेंनी पुढे म्हटलं की, “ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले. दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर’. दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते ते म्हणाले, “तुझ्या वडीलांकडे सुखी माणसाचा सदरा होता. तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा. आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण मानेंच्या वडिलांचे पूर्ण नाव दिनकरराव मारुती माने असून त्यांनी सातारा येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचं किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे. दरम्यान, किरण मानेंनी शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच या दु:खातून सावरण्यासाठी किरण यांना कमेंट्समध्ये धीर देण्याचाही प्रयत्न केला आहे.