scorecardresearch

Premium

‘आयुष्यात चढ-उतार तर असतातच’

‘हिरोपंती’पासून सुरुवात केलेली क्रिती स्वत: अभियांत्रिकीची पदवीधारक आहे.

क्रिती सनन
क्रिती सनन

|| गायत्री हसबनीस

हॉलीवूड अभिनेत्री एमा वॅटसन हिने मध्यंतरी केलेल्या भाषणात आपल्या अभिनयाबरोबरच शैक्षणिक प्रगतीवरही मत मांडलं होतं. कलाकाराला अभिनयाबरोबरच शिक्षणातही पुढे असायला हवं आणि आज बॉलीवूडमध्येही कितीतरी कलाकार उच्चशिक्षित आहेत. शिक्षण केवळ कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणूनही तुमच्या जाणिवा समृद्ध करते, असे सांगत आयुष्यात चढ-उतार कायमच असतात. तुम्ही आजूबाजूला काय चाललं आहे हे समजून घेऊन आपले निर्णय घेतले पाहिजेत, असे मत बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सनन हिने व्यक्त केले.

‘हिरोपंती’पासून सुरुवात केलेली क्रिती स्वत: अभियांत्रिकीची पदवीधारक आहे. मात्र, नंतर मॉडेलिंग क्षेत्रात शिरलेल्या क्रितीने बॉलीवूडची वाट आपलीशी केली. इथेही सुरुवातीच्या काळात ‘दिलवाले’, ‘राबता’सारखे व्यावसायिक चित्रपट केल्यानंतर आता मात्र तिने आपली वाट बदलली आहे. ‘बरेली की बर्फी’सारखा आशयात्मक आणि तरीही व्यावसायिक मूल्य जपणारे चित्रपट करण्यावर सध्या तिचा भर आहे. इतक्या कमी वेळात का होईना पण यश-अपयश ही कायम राहणारी गोष्ट नाही. ती दर चित्रपटागणिक बदलत असते. त्यामुळे अमुक एक शैलीचा चित्रपट केला म्हणजे मी यशस्वी होईन आणि केवळ आशयात्मक करत राहिले तर अपयशी ठरेन, असा विचार मी करत नाही, असं क्रिती सांगते. ‘तुम्ही कोणत्या कारणासाठी चित्रपट निवडता हे महत्त्वाचं आहे’, असे सांगत कुठल्याही एका शैलीत किंवा प्रतिमेत अडकून न राहता कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका करायला हव्यात, असं ती म्हणते. क्रिती फक्त अभिनयापुरती मर्यादित नाही. तर ती एकाच वेळी ‘मिस टेकन’सारखा तिचा स्वत:चा फॅ शन ब्रँड चालवत आहे. त्याचबरोबर सध्या‘न्यूझीलंड एज्यूकेशन’ची ब्रँड अम्बॅसेडर म्हणूनही ती काम पाहते आहे. त्यामुळे बॉलीवूड कलाकारांच्या शिक्षणाबद्दल सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही पण सध्याचे अनेक कलाकार हे परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले आहेत. ज्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं त्यांनीही आपली चित्रपट कारकीर्द घडवल्यावर आपले शिक्षण पूर्ण केले अशी माहिती क्रितीने दिली. ‘अभिनेत्री सोहा अली खान, परिणती चोप्रा, प्रीती झिंटा, रणदीप हुडा यांसारख्यांनी परदेशातून उच्चशिक्षण मिळवले आहे. किंबहुना काहींच्या बाबतीत त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ  शकले नाही म्हणून जिद्दीने त्यांनी ते पूर्णही केले. शाहरूख खान, सुनिधी चौहान यांनी पीएचडी मिळवली आहे. त्यामुळे बॉलीवूड कलाकारांसाठीही शिक्षणाला तितकेच महत्त्व आहे’, असे तिने सांगितले.

क्रितीचे आगामी चित्रपटही अत्यंत वेगळे आणि वैविध्यपूर्ण आहेत. सध्या ती पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसैनबरोबर ‘अर्जुन पतियाला’ करते आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ चित्रपटात ती अर्जुन कपूरबरोबर दिसणार आहे. कार्तिक आर्यन या नव्या कलाकाराबरोबर एका वेगळ्या भूमिकेत ती दिसणार आहे. याशिवाय, ‘हाऊसफुल ४’ सारखा व्यावसायिक चित्रपटही ती करते आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या चित्रपटांचा समतोल साधावाच लागतो, असं ती म्हणते. ‘कलाकार म्हणून मी वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि माझा प्रयत्नही तोच असतो. प्रत्येक चित्रपट, दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर तुम्ही काम करत जाता तेव्हा तुम्ही सतत नवनवीन काही शिकत असता. चित्रपटाचं तंत्र काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याची मदत होते. विशेषत: तुम्ही जेव्हा कुठलीही चित्रपटाची पाश्र्वभूमी नसताना या क्षेत्रात शिरता तेव्हा या माध्यमांचं इत्थंभूत आकलन होणं गरजेचं असतं जे सातत्याने वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करूनच साध्य होतं’, असं ती ठामपणे सांगते. आताही ती असाच अनुभव घेते आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटासाठी ती खूप उत्साही आहे. या चित्रपटात तिला मराठी भाषेत संवाद म्हणायचे आहेत. त्यामुळे एकीकडे तिचे मराठीचेही धडे सुरू आहेत. एकाच वेळी अभिनेत्री, उद्योजिका अशी तिची घोडदौड सुरू आहे. लवकरच ती आपली बहीण नूपुरबरोबरही हिंदी चित्रपट करणार आहे.

कलाकार तो अभिनेता असो वा अभिनेत्री बॉलीवूडमध्ये अभ्यासू वृत्तीचेही कलाकार आहेत. कोणतीही भूमिका उत्तमपणे वठवायची असेल तर प्रचंड माहिती गोळा करावी लागते. अनेक गोष्टी अगदी आपण परीक्षेसाठी शिकतो त्याप्रमाणे शिकून घ्याव्या लागतात, सराव करावा लागतो, संदर्भ ताडून पहावे लागतात. त्यामुळे एकार्थी या ना त्या कारणाने आम्ही सतत शिकतच असतो.  आपल्या चित्रपटांच्या यशापयशातून शिकत शिकतच मी पुढच्या चित्रपटांचा मार्ग स्वीकारते.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kriti sanon emma watson

First published on: 08-07-2018 at 03:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×