अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. यानंतर केआरकेने अनेक कलाकारांवर टीका केली. आता केआरकेने बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’ म्हणजेच अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘बेल बॉटम’ हा चित्रपट लॉकडाउननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला. अक्षय लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन जवळ जवळ वर्ष उलटले आहे. मात्र लॉकडाउनमुळे रोहितने याची प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. रोहित शेट्टीला हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचा नाही. म्हणून तो चित्रपटगृह उघडण्याची वाट बघत आहे. अशात अभिनेता केआरकेने यावर एक ट्विट शेअर करत अक्षय कुमारवर टीका केली आहे.

केआरकेचं असं मत आहे की अक्षय कुमारचे दोन्ही चित्रपट ‘लक्ष्मी’ आणि ‘बेल बॉटम’ काही खास चालले नाहीत. या कारणामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ साठी फक्त ५० कोटी रुपये देतं आहेत. त्याने शेअर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, #ओटीटी #सूर्यवंशीला फक्त ५० कोटी रुपये ऑफर करत आहेतं. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी होतं! म्हणजे आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत. वाईट झालं! या मागचे कारण आहे त्याच्या आधीचे चित्रपट काही खास चालले नाहीत.”

याआधी देखील केआरकेने अक्षय कुमारवर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी केआरकेने अक्षय कुमारला खोटा  देशभक्त असल्याचा टोला देखील लगावला होता. तसंच अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वाबद्दल तो अनेकदा ट्रोल करतो असतोत. ‘सूर्यवंशी’बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे निर्माते महाराष्ट्रात चित्रपटगृह सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. अक्षय आणि टीमचा असा विश्वास आहे की बॉक्स ऑफिसचा ३०% व्यवसाय एका राज्यातून येतो. ‘सूर्यवंशी’च्या रिलीज डेट बद्दल एका मुलाखतीत बोलताना अक्षयने त्याला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.