लॉकडाउनमध्ये ‘रामायण’ व ‘महाभारत’ या पौराणिक मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्या. इतक्या वर्षांनंतरही या मालिकांची लोकप्रियता कायम आहे, याचा पुरावा पुन्हा एकदा मिळाला. ‘रामायण’ या मालिकेने टीआरपीचे नवे विक्रम रचले. या मालिकेत ज्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या नुसार सोशल मीडियावर ट्रेण्ड्स पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत कुंभकर्ण येताच ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडू लागला.

‘जेव्हा रामायणात तुमच्या आवडीची भूमिका येते’, असं म्हणत नेटकऱ्यांनी कुंभकर्णाचे फोटो पोस्ट केले आहेत. तर काहींनी लॉकडाउनचा संदर्भ घेत म्हटलं, ‘सगळेजण लॉकडाउन कधी संपेल याची वाट पाहत आहेत तर मी कुंभकर्ण कधी उठणार याची वाट पाहतोय.’ काहींनी कुंभकर्णाच्या सीनचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अभिनेते नलिन दवे यांनी रामायणात कुंभकर्णाची भूमिका साकारली होती. १९९० मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. नलिन यांनी नाटकातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं होतं. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आपकी सजा’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.