लोकप्रिय टीव्ही शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दुसरा सीझन लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे. स्टार प्लसने या शोचा पहिला लूक रिलीज केला आहे.

२५ वर्षांनंतर स्मृती इराणी यांना तुलसीच्या भूमिकेत पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. या शोच्या माध्यमातून अभिनेत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.

चाहते त्यांना बऱ्याच काळानंतर टीव्हीवर पाहण्यास उत्सुक आहेत. या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये स्मृती यांचा पहिला लूक समोर आला आहे. दरम्यान, आता या शोसाठी स्मृती यांच्या मानधनाचीही चर्चा सुरू झाली आहे. असे सांगितले जात आहे की, जेव्हा हा शो सुरू झाला तेव्हा त्या प्रति एपिसोड १८०० रुपये घेत होत्या. परंतु आज प्रत्येक एपिसोडसाठी त्यांचे शुल्क कितीतरी पटींनी जास्त आहे.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेबद्दल सोशल मीडियावर चर्चा आहे की, २००० मध्ये स्मृती इराणी यांनी ही मालिका केली तेव्हा त्यांना एका एपिसोडसाठी १८०० रुपये मिळत होते. अशा परिस्थितीत आता सध्याच्या त्यांच्या मानधनाबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, स्मृती इराणी एकता कपूरच्या लोकप्रिय शोसाठी मोठी रक्कम घेत असल्याचा दावा केला जात आहे. असे म्हटले जात आहे की, त्या एका एपिसोडसाठी १४ लाख रुपये घेत आहेत. त्या १५० एपिसोड करणार आहेत. या अर्थाने, या टीव्ही मालिकेतून अभिनेत्री २१ कोटींची कमाई करेल, असे दिसते. मालिकेच्या निर्मात्यांनी किंवा अभिनेत्रीने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

स्मृती इराणी टीव्हीवर त्यांच्या पुनरागमनाबद्दल खूप आनंदी आहेत. त्यांना आनंद आहे की, त्या पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रिय तुलसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या एकता कपूरच्या शोसाठीदेखील खूप उत्सुक आहेत.

हा शो आपण कधी आणि कुठे पाहू शकतो?

एकता कपूरचा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ हा शो २९ जुलैपासून रात्री १०.३० वाजता प्रदर्शित होईल. ही टीव्ही मालिका स्टार प्लसवर आणि जिओ हॉटस्टार ओटीटीवर पाहता येईल. ओटीटीवर हा एपिसोड कधीही पाहता येईल. जेव्हा निर्मात्यांनी शोची वेळ जाहीर केली तेव्हा अनेक चाहते त्यावर नाराज झाले. त्यांनी प्रश्न केला की, हा इतका उशिरा का ठेवला जातो, तो कोण पाहणार? लोकांनी सल्ला दिला की, तो रात्री ८ किंवा ८.३० वाजता प्रसारित व्हायला हवा होता.

स्मृती इराणी आणि स्टार प्लसच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून या शोचा पहिला लूक रिलीज होण्याबाबत लिहिले आहे, “तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाहीये का? २५ वर्षांनंतर तुलसी वीरानी एका नवीन कथेसह परतत आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा प्रत्येक घराचा भाग बनण्यास सज्ज आहे, तुम्हीही तयार आहात का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.