रेश्मा राईकवार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा योग साधून त्यांच्या भगिनी मीना खडीकर यांनी लिहिलेल्या ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद ‘दीदी और मैं’ नावाने दीदींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रसिद्ध पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला असून परचुरे प्रकाशन मंदिराने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने मीनाताई यांनी लतादीदींच्या आठवणी, दीनानाथ मंगेशकरांसारखा कलावंत पिता आणि ते गेल्यानंतर दीदींनी घेतलेली जबाबदारी अशा अनेक आठवणींवर गप्पा मारल्या. लतादीदींच्या मायेच्या सावलीत आपली घडण झाली. याच सावलीतील जडणघडणीच्या आठवणींचा कोलाज मीनाताईंनी गप्पांदरम्यान उलगडला..

‘मंगेशकरांच्या घरात खेळणारी पाच भावंडं. या भावंडांमध्ये सगळ्यात मोठी लता, त्यामुळे खेळातलं नेतृत्वही तिचंच. त्या वेळी पाहिलेल्या ‘संत तुकाराम’ चित्रपटाचा प्रभाव मुलांवर होता. त्यामुळे तुकारामांचा अभिनय करणारी लता आणि तिच्यासमोर बसलेली तिची भावंडं असा हा खेळ रंगला होता.’’ एरव्ही चेहऱ्यावर मिश्कील भाव असलेल्या दीदींचे व्यक्तिमत्त्व धीरगंभीर असल्याचे जाणवते, त्यामुळे हा खोडकरपणा नाही म्हटले तरी नवल वाटायला लावणारा आहे. हे एक चित्र, तर त्यानंतर कित्येक वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुरेल गळ्याची गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या दीदींना शोमन राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम् सुंदरम्’ या चित्रपटातील हे गाजलेले शीर्षकगीत गाण्यासाठी विनंती केली. त्या वेळीही हिंदी चित्रपटसृष्टीत शाब्दिक चकमकी, खटके उडणं या गोष्टी नवीन नव्हत्या. दीदी आणि राज कपूर यांच्यातही अशीच चकमक झाली होती, त्यामुळे दीदी हे गाणे गाण्यास तयार नव्हत्या आणि हे गाणे त्यांच्याशिवाय कोणीही उत्तम गाऊ शकत नव्हते. अखेर गीतकार पंडित नरेंद्र शर्मा ज्यांना दीदी ‘पापा’ असं संबोधत, त्यांनी दीदींना केवळ आपल्यासाठी गाणे गाण्याचा आग्रह केला. मी स्टुडिओत येईन, गाणे गाईन आणि बाहेर पडेन, या अटीवर दीदी तिथे पोहोचल्या. इतके अवघड गाणे त्यांनी तिथे बसून समजून घेतले आणि एका टेक मध्ये त्यांनी गाणे गाऊन पूर्ण केले. त्याच दीदींचा हा करारीपणाही तितकाच प्रेरणादायी आहे.

कुठलाही तामझाम न बाळगता, अत्यंत साधेपणाने आणि केवळ आपल्या कलेच्या बळावर स्वाभिमानाने, कठोर परिश्रमाने दीदीने या पुरुषप्रधान क्षेत्रात ज्या पद्धतीचे यश मिळवले ते आजपर्यंत क ोणत्या पुरुषालाही करता आलेले नाही. त्यामुळे दीदीवर टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे, असं मीनाताई म्हणतात तेव्हा खरोखरच जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या लता मंगेशकरांसारख्या प्रतिभावंताचे जगणे नव्याने समजून घेण्याची गरज वाटू लागते. अर्थात, त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने जर ही प्रतिभेची गोष्ट उलगडली तर त्यासारखी पर्वणी नाही आणि लता मंगेशकरच नव्हे तर संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय, पंडित दीनानाथ मंगेशकरांपासून सुरू झालेला इतिहास ते आता नातवंडांपर्यंत येऊन पोहोचलेले वर्तमान असा खूप मोठा प्रवास मांडण्याचे काम त्यांच्या भगिनी मीना खडीकर केलं आहे.

स्वत: गायिका-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीनाताई या पुस्तकाचे त्यांच्या दृष्टीने असलेले महत्त्व थोडक्यात सांगतात. आपल्यासाठी जरी हा सोनेरी इतिहासाचा दस्तावेज असला तरी मंगेशकर कुटुंबीयांसाठी या लाखमोलाच्या आठवणी आहेत. ‘‘दीदीचं आणि माझं नातं दुसऱ्यांनी हेवा करावा इतकं घट्ट आहे. तशी आम्ही पाचही भावंडं एकमेकांशी घट्ट बांधलेलो आहोत. आमच्यात हेवेदावे, भांडणं नाहीत, आम्ही आजही एकत्र आहोत. दीदी कशी होती आणि ती कशी झाली, हे मांडण्याचा प्रयत्न मी ‘मोठी तिची सावली’मधून केला. तिने आमच्यासाठी खूप त्याग केला. स्वत:चा संसार होऊ दिला नाही. स्वत:साठी तिने काही केलं नाही, आमच्याक डूनही तिने कधी काहीही घेतलं नाही. ती फक्त देत राहिली. तिने जे काय केलं आमच्यासाठी ते खूप मोठं आहे, तिला आम्ही काय देणार? म्हणून निदान या आठवणींवर एक पुस्तक तिच्यासाठी लिहावं, जेणेकरून तिच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील, तिला बरं वाटेल, असा विचार माझ्या मनात आला आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. आता त्याचा हिंदी अनुवाद ‘दीदी और मैं’ या नावाने प्रकाशित केला, जेणेकरून देशभरात जे दीदींचे चाहते आहेत, त्यांच्यापर्यंत तिची गोष्ट, तिचं कर्तृत्व, तिने घेतलेले अपार कष्ट हे सगळं पोहोचेल,’’ असं मीनाताई सांगतात.

आज लता मंगेशकर यांनी मिळवलेलं यश लोकांना दिसतं, मात्र अगदी तेराव्या वर्षी तिच्यावर जबाबदारी पडली होती. त्याआधी आम्ही खूप सुखी, आनंदी कुटुंब होतो, असं त्या म्हणतात. लहानपणी बाबा गायचे, मग दीदी गायची. गाणं झालं, आता दंगा कोण करणार? ती मोठी असल्याने तीच दंगा करायची. तिच्यामागची मी.. आम्ही दोघी दिवसभर धुडगूस घालायचो. काहीच काम करत नव्हतो. आमची माई आम्हाला मारेपर्यंत आमचा दंगा थांबायचा नाही आणि खूप सुख होतं त्या वेळी आमच्या घरात. पैसा होता, गाडय़ा होत्या, नोकरचाकर होते. कं पनीत दीडशे जणांचा कर्मचारी म्हणून वावर होता. एखाद्या जगावर राज्य करत असल्यासारखेच होतो आम्ही.. अर्थात, एका क्षणी हे सगळं गेल्यानंतरही आम्ही आनंदातच होतो, कारण त्या वेळी आमच्याबरोबर बाबा होते, माई होती. त्यामुळे सगळं गेलं तरी हे दोघं आहेत ना, त्यांच्यापुढे आम्हाला काहीही नको. इतक्या सहज आनंदाने आम्ही जगत होतो. बाबा गेल्यावर मात्र सगळं चित्र बदललं, असं त्या सांगतात. त्यांची आई म्हणजे माई या स्वभावाने अगदी साध्या होत्या. त्या काळी सातवी-आठवीपर्यंत शिकलेली माई.. पदरी चार मुली. दीदी तेरा वर्षांची, तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मी लहान, आशा तर त्या वेळी सात-आठ वर्षांची होती. उषा आणि बाळ (हृदयनाथ) दोघेही अगदीच लहान. बाळ तर चार वर्षांचा होता आणि त्यात त्याला बोन टीबी झाल्याने तो अंथरुणावरच होता. बाबा गेले तेव्हा त्यांच्यासाठी रडायलाही आम्हाला वेळ मिळाला नाही, हे सांगताना मीनाताईंचा आवाज कातर होतो. बाबा गेले आहेत हे फक्त दीदी, मी आणि आशा आम्हा तिघांनाच माहीत होतं. आईला तर रडताही येत नव्हतं, कारण मुलं बाबांविषयी विचारत होती. त्यांच्यापासून खूप दिवस बाबांच्या जाण्याची गोष्ट लपवून ठेवली होती. त्या वेळी दीदीला नोकरी करावी लागली. पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लावून काम करावं लागलं, तिला अभिनय कधीच वरून आवडत नव्हता; पण तेव्हा सगळ्याच नायिका गाणाऱ्या होत्या, त्यामुळे दीदीलाही अभिनय करावा लागला. मास्टर विनायक यांच्याबरोबर आम्ही सगळेच मुंबईत आलो आणि दीदीचं काम सुरू झालं. ते गेल्यानंतर मात्र दीदीने अभिनय करायचा नाही हा निर्धार केला, अशी आठवण सांगणाऱ्या मीनाताई माणसाला कुठलीच गोष्ट अशी सहज-सरळ मिळत नाही. त्यामुळे सुखाचे दिवस खुद्द दीदींना आणि कुटुंबीयांनाही सहज मिळाले नाहीत, हे आग्रहाने सांगतात.

खरं तर, मराठी नाटकांचा जो सुवर्णकाळ होता त्या काळातील अग्रणी शिलेदारांपैकी एक म्हणून पंडित दीनानाथ मंगेशकरांचे नाव घेतले जाते. दीनानाथ मंगेशकर हे अस्सल कलावंत म्हणूनच कायम वावरले. त्यांना व्यवहाराशी देणेघेणे नव्हते. ते खऱ्या अर्थाने गाण्यातच रमत असत, असं मीनाताई सांगतात. बाबांनी कधी व्यवहार पाहिला नाही. एक तर बोलपट आल्यानंतर कं पनीचा उतरता काळ सुरू झाला, पण कर्मचाऱ्यांचे काय करणार? म्हणून मग बाबांनी कंपनीच्या माध्यमातून चित्रपटनिर्मितीचा निर्णय घेतला आणि त्यावर अमाप खर्च केला; पण त्यांना सिनेमातलं काही कळत नव्हतं, त्यामुळे त्यांनी लोकांवर विश्वास ठेवला आणि अनेकांनी त्यांना फसवलं. त्या वेळची एक आठवणही मीनाताईंनी सांगितली. स्वातंत्र्यकार्यात बाबांचा सहभाग होता, त्यासाठी बाबांना तुरुंगात जावं लागलं. बाबांचा एक मित्र घरी आला आणि त्यांना सोडवण्यासाठी पैशाची गरज असल्याचे माईंना सांगितले. माईंनी क्षणाचाही विचार न करता अंगावरचे आणि घरात असलेले सगळे दागिने काढून दिले. बाबा सुटून आल्यावर या मित्राने केलेली फसवणूक लक्षात आली. तोवर तो मित्र त्या पैशातून परदेशात निघून गेला होता. एकूणच व्यवहारी वृत्ती घरात कोणाचीच नव्हती, आजही नाही. दीदी काय, आशा काय, ही सगळीच मंडळी विचार न करता देऊन टाकणारी आहेत. व्यवहार आता मुलं सांभाळतात, असं त्या म्हणतात.

खडतर परिस्थितीतून जात असताना खऱ्या अर्थाने स्थिरस्थावर झाल्याची भावना ही १९४७ नंतर कुटुंबात आली, असं त्या सांगतात. त्या वेळी दीदींची ‘बरसात’, ‘श्री ४२०’सारख्या चित्रपटांमधून गाणी लोकप्रिय झाली होती. मग आम्ही मुंबईत चांगल्या घरात राहण्यासाठी आलो. त्या वेळी अनेक चांगले संगीतकार दीदींशी जोडले गेले, असं त्या सांगतात. सलील चौधरी, अनिल बिस्वास, हेमंत कुमार, नौशादजी हे सगळे संगीतकार दीदींशी चांगले वागले. त्यांच्याबरोबर काम करणं दीदींनाही आवडत होतं. नौशादजींचं तर दीदींवर खूप प्रेम होतं. ते सगळी गाणी दीदीकडूनच गाऊन घेत असत. अपवाद केला त्यांनी.. पण कायम दीदीच्या पाठीशी उभे होते. आत्ताच्या संगीतकारांबद्दल दीदीला फारशी माहिती नाही आणि आता ती त्या पद्धतीच्या संगीतात फिट बसतही नाही. मात्र नव्या पिढीतील संगीतकारही दीदीशी त्याच आदराने वागतात, तिला खूप मानतात, अशा शब्दांत त्यांनी कौतुकही केले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांची अवीट गाणी हे समीकरण जे जमून आले, त्याचा किस्साही मीनाताईंनी सांगितला. आमची एक सुरेल पार्टी होती, ज्यात आम्ही चित्रपटांची गाणी गायचो आणि ठिकठिकाणी कार्यक्रम करायचो. त्या ग्रुपमध्ये लक्ष्मीकांत मेंडोलिन वाजवायचा, तर प्यारेलाल व्हायोलिन वाजवायचे. त्या वेळी कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे ते साहाय्यक म्हणून काम करत होते. काही काळानंतर दीदीने त्यांना तुम्ही संगीतकार म्हणून काम करा, असा सल्ला दिला. त्या वेळी ‘पारसमणी’ या चित्रपटात पहिल्यांदा दीदी त्यांच्यासाठी गायली. दीदीने त्यांना संगीतकार म्हणून प्रोत्साहन दिलं. पुढे ही जोडी संगीतकार म्हणून लोकप्रिय झाली. दीदीवर प्रेम करणारी अशी अनेक मंडळी तिच्याशी जोडलेली आहेत, असं मीनाताई सांगतात.

संगीताचा हा वारसा पाचही भावंडांनी आपापल्या पद्धतीने जपला. कोणी कोणाची नक्कल केली नाही, असं त्या स्पष्टपणे सांगतात. मुळात आमच्यात कधीच भांडणं नव्हती. दीदीने तर कधीच तिच्या गाण्यांविषयी चर्चा केली नाही आणि आम्हीही कधी तिला काही बोललो नाही. आमचे विषयच सगळे वेगळे असतात. माध्यमं काहीही गोष्टी बनवून सांगतात, पण त्यात अजिबात तथ्य नाही, असं मीनाताई म्हणतात. आशाने तर वेगळाच रस्ता धरला. तिला तिचा आवाज आणि स्वभाव दोन्ही वेगळं आहे हे जाणवलं होतं. त्यामुळे दीदीची नक्कल करण्याचा प्रश्नच नव्हता. ती तिच्या स्वभावानुसार खेळकर, उडती गाणी गात राहिली. उषाचा मराठी बाज असल्याने तिने लावण्यांवर लक्ष केंद्रित केलं. बाळ तर उत्तम शास्त्रीय संगीत शिकला आणि संगीतकार म्हणून नावारूपाला आला. त्यामुळे आमच्यात वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही पाचही जण एकत्र आहोत, असं सांगताना या भावंडांना बांधून ठेवण्याचं श्रेय मीनाताई आपल्या आईला देतात. माईने आम्हाला चांगले संस्कार दिले, तिने सगळ्यांना बांधून ठेवलं. ती कायम म्हणायची, तुम्ही पाच बोटं आहात तशीच घट्ट एकत्र राहा. ही पाच बोटं तोडू नका, अर्धवट व्हाल.. माईंची ही शिकवण आजही आपल्याबरोबर असल्याचं त्या सांगतात. याच एकत्रित राहण्याच्या वृत्तीतून मंगेशकर कुटुंबीयांची पुढची पिढीही त्याच पद्धतीने एकमेकांना सांभाळून पुढे जात असल्याचा आनंदही मीनाताईंच्या चेहऱ्यावर दिसतो. जवळपास ऐंशी वर्षांहून जास्त काळ मंगेशकर कुटुंबीय संगीत क्षेत्रात खंदेपणाने उभं आहे. इतक्या वर्षांत आजूबाजूचं सामाजिक-सांस्कृतिक भान ज्या पद्धतीने बदलत गेलं ते पाहताना चांगलं काही निसटून गेल्याची भावना अधिक आहे, असं त्या म्हणतात. संगीताच्या क्षेत्रात तर आता संगीत उरलेलंच नाही, अशी दीदींचीही भावना असल्याचं त्या सांगतात. आताच्या पिढीला खरंच तुम्ही शास्त्रीय संगीत शिका. तुम्ही संगीतात हर तऱ्हेचे प्रयोग करा, पण शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम केल्याशिवाय तुम्हाला यशाचा इमला बांधता येणार नाही. तो कधी ना कधी कोसळणारच, असा कळकळीचा सल्ला त्या देऊ इच्छितात. दीदीची रेकॉर्ड ऐकून नकला करत गाणं शिकणाऱ्यांनाही, हे चुकीचं करत आहात, असं सांगावंसं वाटतं. मात्र आपण सांगितलेली गोष्ट चुकीच्या दृष्टिकोनातूनच घेतली जाते, हाच अनुभव वाटय़ाला येतो, असं त्या म्हणतात. त्यामुळे आम्ही स्वत:हून इतरांना काही सांगायला जात नाही, पण या पिढीला पुढे जायचे असेल तर आपल्या संगीत परंपरेची, तत्त्वांची-नीतिमत्तेची जपणूक व्हायलाच हवी. आमच्या नातवंडांनाच नाही तर या नव्या पिढीलाच हे आपलं कळकळीचं सांगणं आहे, असं मीनाताई पुन:पुन्हा सांगतात.

मुलांची गाणी आणि मीनाताई..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीतकार म्हणून मीनाताईंनी संगीतबद्ध केलेली ‘चॉकलेटचा बंगला’, ‘सांग सांग भोलानाथ’ ही गाणी आजही आबालवृद्धांच्या ओठावर आहेत. त्या वेळी सगळ्याच चित्रपटांतून मोठी माणसं लहान मुलांची गाणी गाताना बघत होते. मुलांची गाणी मोठय़ांनी गायची नाहीत, असं ठरवून मुलांना आवडतील असे विषय गाण्यासाठी घेतल्याचे मीनाताईंनी सांगितले. राजाभाऊ मंगळवेढेकर, मंगेश पाडगावकर यांची गीतं मी घेतली. मुलांना चॉकलेट आवडतं म्हणून मी चॉकलेटचा बंगला घेतला, त्यांना ससा आवडतो म्हणून मी सशाचं गाणं घेतलं. मुलांना खूप वाटत असतं आज शाळेला सुट्टी मिळावी किंवा पाऊस पडावा, म्हणून भोलानाथची निवड केली. या त्यांच्या मनातील भावना होत्या ते मांडणारी गाणी मी घेतली. उगाच त्यांना केवळ मोठमोठी देशभक्तीपर गीते गायला लावणे योग्य वाटले नाही, कारण ती गाणी त्या वयात त्यांच्या डोक्यात फारशी शिरत नाहीत. ही सगळी गाणी खूप चालली, याचा मला आनंद वाटतो. अगदी आता सहा महिन्यांपूर्वीपर्यंत मला या गाण्यांची रॉयल्टी मिळत होती, असं त्या सांगतात. मीनाताईंनी त्यांची मुलं योगेश-रचना यांच्याबरोबरच साधना सरगम, अपर्णा मयेकर, शिवांगी कोल्हापुरे यांच्याबरोबरही गाणी रेकॉर्ड केली. ‘थ्री हिट रिपीट्स’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ अशी गोष्टींची रेकॉर्डही त्यांनी काढली होती.