गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने वर्षानुवर्षे लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या आवाजाचा चाहता नाही असा कोणी माणूस सहजासहजी सापडणार नाही. या गानकोकिळेने त्यांच्या चाहत्यांना गुढीपाडव्यानिमित्त एक गोड सरप्राईझ दिलं आहे.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर लता मंगेशकर यांचा एक नवा अल्बम श्रोत्यांच्या भेटीला आला आहे. ‘भावार्थ माऊली’ असं या अल्बमचं नाव आहे. या अल्बममध्ये १० भक्तीगीते आहेत. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी ही गीते रचली आहेत. ही भक्तीगीते संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्यावर आधारित आहे. याबद्दल बोलताना हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं, “ही गाणी मी आणि लतादीदींनी ५० वर्षांपूर्वी तयार केली होती. लतादीदींच्या मधुर निवेदनाचा समावेश करुन ही गाणी आता सादर करत आहोत.”
यापूर्वी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी ज्ञानेश्वर माऊली हा अल्बम श्रोत्यांच्या भेटीला आणला होता. आता पुन्हा एकदा ‘भावार्थ माऊली’ हा १० भक्तीगीतांचा अल्बम श्रोत्यांच्या भेटीला आला आहे. या गीतांचा भावार्थ सांगणारं निवेदनही या अल्बममध्ये आहे. याबद्दल बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या, “ही माझ्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मला संत ज्ञानेश्वरांच्या रचना सादर करण्याची संधी मिळाली. श्रोत्यांसाठी ही भक्तीगीते ऐकणं हा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव असणार आहे.”
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा अल्बम श्रोत्यांच्या भेटीला आला आहे. युट्युब आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.