ज्येष्ठ संगीतकार लक्ष्मीकांत यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार

प्रसिद्ध गायिका उषा तिमोथी यांना मोहम्मद रफी पुरस्कार

सिनेसंगीत जगतात ज्यांच्या संगीताने रसिकांना बेधुंद केले, ठेका धरायला लावले असे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध गायिका उषा तिमोथी यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मोहम्मद रफी यांच्या ९३ व्या जयंती निमित्त केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून संगितकार लक्ष्‍मीकांत कुडाळकर यांना देण्‍यात येणा-या जीवन गौरव पुरस्‍कार एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे स्वरूप असून, उषा तिमोथी यांना देण्‍यात येणारा ५१ हजार रू. धनादेश आणि स्‍मृतीचिन्‍ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या दहा वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६ वा. सुरू होणार असून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

यापुर्वी संगीतकार प्यारेलाल, आनंदजी, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Late laxmikant received the mohmmad rafi jeevan gaurav award