ओटीटीवर क्राइम थ्रिलरसस्पेन्स विषयांच्या वेबमालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे अनेकदा त्याच त्याच प्रकारच्या थ्रिलर कथा आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच या धबडग्यात क्रिमिनल जस्टिस ही मालिका आपला आब राखून आहे. घडतो गुन्हाच, पण या मालिकेत तो वकिली डावपेचांच्या माध्यमातून उलगडत जातो. आतापर्यंत प्रदर्शित झालेले तीनही सीझन गाजल्यानंतर आता ‘क्रिमिनल जस्टिस’चा चौथा सीझन अलीकडेच जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे आणि तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

एक हत्या, आरोपी (बहुतांश) त्या हत्येच्या गुन्ह्यात अडकलेले आणि त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी झटणारा वकील आणि अर्थात त्यांना दोषी सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा सरकारी वकील असा या मालिकेचा साचा ठरलेला आहे. वकिलाचे काम प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी वठवले आहे. त्यामुळे पंकज त्रिपाठीचे चाहते या वेबमालिकेला विशेष उचलून धरतात. पहिले तिन्ही सीझन याच धाटणीचे होते, परंतु चौथा सीझन आणखी उत्कंठावर्धक करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी दोन नव्हे तर तीन वकिलांना रिंगणात उतरवले आहे. पंकज त्रिपाठी आणि मीता वसिष्ठ असा तगडा सामना प्रेक्षकांना यापूर्वीच्या सीझनमध्ये आवडला होता. त्यामुळेच या सीझनमध्येही मीता वसिष्ठ यांच्या भूमिकेला पुन्हा वाव देण्यात आला आहे.

रोशनी सलुजा (आशा नेगी) या नर्सची हत्या होते. ती डॉ. राज नागपाल (जिशान अय्युब) आणि अंजू नागपाल (सुरवीन चावला) यांच्या आजारी मुलीची काळजी घेत असते. नागपाल दाम्पत्य विभक्त असतं पण त्यांचा घटस्फोट झालेला नसतो आणि राज नागपाल नर्स रोशनी सलुजाच्या प्रेमात पडतो. तिची हत्या होते तेव्हा राज नागपाल, अंजू नागपाल आणि त्यांची मुलगी घटनास्थळी असते. त्यामुळे या सर्वांभोवती संशयाची सुई फिरत असते. राज आणि अंजू या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून अटक होते. माधव मिश्रा (पंकज त्रिपाठी) डॉ. राज नागपालचे आणि मंदिरा माथुर (मीता वसिष्ठ) या अंजू नागपालचे वकीलपत्र घेतात. लेखा अगस्त्य (श्वेता बसू प्रसाद) ही सरकारी वकील असते.

पंकज त्रिपाठीचे माधव मिश्रा हे पात्र त्याच्या मालिकेतील वैयक्तिक आयुष्यात सुरुवातीपासून सीझनगणिक विकसित होत जात आहे. त्यांचे वकिली पेशातील सुरुवातीचे अपयश, त्यांची पत्नी, तिचा व्यवसाय, चौथ्या सीझनपर्यंत त्यांना एक निष्णात वकील म्हणून मिळालेली ओळख हा प्रवास प्रेक्षकांना भावतो. त्यांच्या पत्नीची रत्नाच्या पात्राचा (खुशबू अत्रे) पहिल्या सीझनपासून बदलत गेलेला प्रवास रंजक आहे. खटल्यातील एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी या पात्राचा चपखल वापर केलेला आहे.

मंदिरा माथुरची मुलगी माधव मिश्रा यांना असिस्ट करत असते. तो मायलेकीतील नात्याचा तणावही मालिकेत आहे. केसचा तपास करणाऱ्या विभक्त पती-पत्नी असलेल्या पोलिसांचीही एक समांतर कथा आहे. म्हणजे कथा केवळ घडलेला गुन्हा, त्याचा तपास आणि कोर्ट रूम ड्रामा इतकीच मर्यादित न राहता या पात्रांभोवतीही फिरते. कारण सीझनगणिक गुन्हेगार, आरोपी बदलत असले तरी ही पात्रं (कदाचित पोलिसांचा अपवाद वगळून) तीच राहतात.

तीन लेखकांनी ही मालिका लिहिली आहे. प्रत्येक लहानसहान गोष्टींतून वकिलांची मुत्सद्देगिरी दर्शविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रोहन सिप्पी यांनी केला आहे. उदाहरणार्थ, महिला पोलिसाबद्दल आदर असूनही माधव मिश्रा तिची दुखरी बाजू हेरून तो कच्चा दुवा कोर्टात आपल्या अशिलाची बाजू मजबूत करण्यासाठी वापरतो. प्रत्येक वकिलाचा आपल्या अशिलापुरता फोकस सुस्पष्ट असतो.

या वेबमालिकेची प्रेक्षकांना न आवडणारी एकच गोष्ट म्हणजे या मालिकेचा प्रत्येक भाग एका आठवड्याच्या अंतराने दर गुरुवारी प्रदर्शित होतो. सीझन ४ चे आतापर्यंत सहा भाग प्रदर्शित झाले असून पुढील गुरुवारी २६ जून रोजी सातवा आणि ३ जुलै रोजी अखेरचा भाग प्रदर्शित होईल. उतावळे प्रेक्षक प्रत्येक भाग आल्या-आल्या पाहत आहेत तर काही जण संपूर्ण सीझन येण्याची वाट पाहत आहेत. पण कथेतील उत्कंठा, सशक्त पात्रे आणि कोर्टरूम ड्रामा असे उत्तम मनोरंजन हवे असेल तर हा सीझन जरूर पाहावा.

क्रिमिनल जस्टीस ४

दिग्दर्शक- रोहन सिप्पी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओटीटी – जिओ हॉटस्टार