काही नाटकं बोधसंदेशाच्या तोंडीलावण्याबरोबर केवळ मनोरंजनाच्या हेतूनेच निर्माण केलेली असतात. मराठी रंगभूमीवरील बहुसंख्य नाटकं याच श्रेणीत मोडतात. त्यामुळे ती साधारणत: त्याच हेतूने पाहिलीही जातात. असंच एक नाटक… प्रसाद खांडेकर लिखित-दिग्दर्शित ह्यथेट तुमच्या घरातूनह्ण याच पठडीचं प्रतिनिधित्व करतं. टीव्हीवरील विनोदी रिअॅलिटी शोमधील कलाकारांना शीर्षक भूमिकांत घेऊन सादर केलेलं हे नाटक. त्यामुळे प्रेक्षकांची नाडी या कलाकारांना गवसलेली नसती तरच नवल. त्याचाच लाभ घेऊन हे नाटक सादर केलं गेलं आहे.
दीपक कदम आणि संध्या कदम हे मध्यमवर्गीय जोडपं. राहुल आणि श्रुती ही त्यांची मुलं. राहुलला आपण अभिनयाच्या क्षेत्रात सुपरस्टार बनावं अशी इच्छा. साहजिकच ऑडिशन वगैरेंत तो बिझी असतो. पण त्याचं कुठंच काही जमत नाही. साहजिकपणेच वडील कावलेले. आणि आपल्यातील हरहुन्नरी कलाकाराची घरच्यांना जाणीव नाही म्हणून राहुलही वैतागलेला. त्यामुळे स्वाभाविकपणेच घरात नेहमी गरमागरमीचं वातावरण. आई मुलाला सतत पाठीशी घालणारी. मुलगी श्रुती रिल्समध्ये दंग. तिला आजूबाजूच्या वास्तवाशी देणंघेणं नाहीए. परिणामी अशा कुटुंबात जे तंग वातावरण असू शकतं ते यांच्याकडे नेहमीच असे. एके दिवशी अचानक राहुल एका रिअॅलिटी शोचा प्रस्ताव घेऊन येतो. पहिल्याच ब्रेकने स्टारडम मिळण्याच्या कल्पनेनं हर्षोल्हसित झालेला राहुल घरी येऊन ती बातमी सर्वांना सांगतो तेव्हा घरी संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. पण या शोच्या निमित्ताने मिळणाऱ्या पैशांमुळे राहुलचे वडील या शोला अखेरीस मान्यता देतात. या शोमध्ये दहा कुटुंबं सहभागी होणार असतात. त्यांच्या घरातील नात्यांचे बंध या कार्यक्रमात जोखले जाणार असतात.
मात्र, कदम कुटुंबीयांचे आपापसातील बंध जगजाहीर असल्याने त्यांना खोटं खोटं नाटक करावं लागणार हे उघड असतं. तसंच होतं. त्यांच्यातले समज-गैरसमज, मतभेद, भांडणं प्रेक्षकांना लाइव्ह दिसतात. पण एका क्षणी कदमांच्या हे लक्षात येतं की आपण नीट डोकं शांत ठेवून खेळलो नाही तर या शोतून बाद होणार, हे नक्की. तशात एक आगंतुक पाहुणी सारा त्या कुटुंबात पाठवली जाते. तिचं मॉॅड वर्तन पाहून कदम बिथरतात. ते तिला आपल्या घराबाहेर काढण्यास बिग बॉसला सांगतात. पण ते शक्य नसतं. अन्यथा त्यांनाच पन्नास लाख रुपये भरावे लागणार असतात. त्यामुळे नाइलाजाने कदम पुढील खेळात सहभागी होतात.
या खेळात पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं. प्रेक्षकांनीही ते प्रत्यक्ष नाटकातच पाहणं उचित.
लेेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी आपल्या पूर्वानुभवातून या नाटकाची रचना आणि सादरीकरण केलं आहे. ‘हास्यजत्रा’चा आपला अनुभव त्यांनी या ठिकाणी कामी आणला आहे. विनोदाचे नाना प्रकार त्यांनी यात हाताळले आहेत. आणि मुळातच विनोदाची जाण असणारी कलाकारांची तगडी टीमही त्यांना लाभली आहे. त्यामुळे यातल्या कॉमेडीशी प्रेक्षक सहज समरस होतात. अर्थात प्रेक्षकांची नाडी प्रसाद खांडेकर यांना सापडलेली असल्याने ते यात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी खेळाचा एक भाग म्हणून भूमिकाबदलाचा दिलेला तडका नाटक अधिक रंगतदार करतो. त्यात सगळ्याच कलाकारांचा कस लागतो. आणि नाटकातील पात्रांनाही एक कुटुंब म्हणून परस्परांबद्दल जाणून घेण्यास मिळतं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यात बॉण्डिंग निर्माण होतं.
प्रसाद खांडेकर यांनी आजकालच्या कुटुंबांतील नात्यांची चिकित्सा या नाटकात करण्याबरोबरच प्रेक्षकांचं फुल्ल एण्टरटेन्मेंट होईल याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे अतिशयोक्तीपासून पीजेपर्यंत सगळे विनोद नाटकात पेरले आहेत. अर्थात त्यांना दणदणीत अपेक्षित प्रतिसाद मिळतो आणि हेच या नाटकाचं यश आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी नाटक पुरेशा संयमानं हाताळलं आहे. एका कुटुंबातील विसंगती तर त्यांना अधोरेखित करायची होतीच, पण त्याचबरोबर त्यांच्यातील नात्यातील तोलही सांभाळायचा होता. तो त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळला आहे. त्यामुळे नाटक विनोदाच्या धांगडधिंग्यात वाहवत गेलं नाही. सगळी पात्रं आपापलं वागणं, बोलणं, वर्तन चोख भूमिकेनुरूप वठवतात. त्यांना सैल सोडलेलं नाही. याचा प्रत्यय भूमिकाबदलात येतो. हा भाग अत्यंत रंजक झाला आहे. त्यात कलाकारांच्या अंगीच्या नाना कळा व्यक्त होतात. ‘हास्यजत्रा’चं जेवढ्यास तेवढं असणं आणि नाटकातील दीर्घ पल्ला यांचं नेमकं भान प्रसाद खांडेकर यांनी राखलं आहे. त्यामुळे नाटकाची ‘हास्यजत्रा’ होत नाही.
संदेश बेन्द्रे यांनी दीपक कदम यांचं मध्यमवर्गीय घर आणि त्याचंच पुढे रिअॅलिटी शोच्या स्टुडिओत केलेलं रूपांतर विषयाच्या मागणीनुरूप आहे. त्यात बिग बॉसची स्वतंत्र व्यवस्थाही व्यावहारिकपणे केलेली आहे. सुशील कांबळे यांचं संगीत नाटकातील नाट्यपूर्णता बरकरार राखतं. श्याम चव्हाण यांनी कदमांच्या घरातलं वातावरण आणि रिअॅलिटी शोमधला तामझाम प्रकाशयोजनेतून समूर्त केला आहे. पूर्णिमा ओक यांनी पात्रांना दिलेली प्रवेशानुरूप आणि विषयाच्या मागणीनुसारची वेशभूषा चपखल. उल्हेश खंदारे यांनी रंगभूषेद्वारे पात्रांना बाह्यरूप बहाल केलं आहे.
यातल्या सर्वच कलाकारांची कामं चोख झाली आहेत. प्रसाद खांडेकर दीपकच्या भूमिकेत कुटुंबप्रमुखाची तडतड आणि नैतिकतेबद्दलचा त्यांचा आग्रह, नंतर नाइलाजानं त्यांना करावी लागणारी तडजोड यथार्थपणे व्यक्त करतात. नम्रता संभेराव यांनी मुलांच्या चुका, दोष पाठीशी घालणारी मध्यमवर्गीय आई आणि भूमिकाबदलानंतर तिच्यात झालेलं आमूलाग्र स्थित्यंतर हे त्यांच्यातील अभिनयाची मोठी रेंज दाखवणारं आणि थक्क करणारं आहे. ओंकार राऊत यांनी राहुलच्या भूमिकेत आपलं करिअर मार्गी लागत नसल्याने आणि घरातील कटकटीमुळे चिडचिडलेला आणि नंतर रिअॅलिटी शोमध्ये बापाच्या भूमिकेत पुरेसा गंभीर झालेला दाखवला आहे. शिवाली परब श्रुतीचं थिल्लरपण आणि बालिश वागणं आणि नंतर आईच्या भूमिकेतला पोक्तपणा उत्तमरीत्या वठवतात. सारा झालेल्या भक्ती देसाई रिअॅलिटी शोमधली मॉड आगंतुक पाहुणी तिच्या ठसक्यासह साकारतात. प्रथमेश शिवलकरही बिग बॉस तथा गॉडफादरच्या भूमिकेत धमाल मालवणी तडका देतात.
एकुणात, फुल्ल एण्टरटेन्मेंट करणारं हे नाटक चार घटका विरंगुळ्यासाठी बघायला पर्याय नाही.