Maharashtra Floods Pravin Tarde Urges To Support : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

या पूरस्थितीमुळे शेती आणि घरांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. अनेक महिन्यांचे कष्ट, उधारीचे कर्ज आणि त्यावर हा पावसाचा तडाखा या साऱ्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नैराश्येतून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दु:खद घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. तसंच अनेकांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे.

अशातच मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडेसुद्धा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. शिवार संसद या संस्थेच्या सहाय्याने प्रवीण तरडेंनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे, याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे म्हणतात, “गेल्या वेळी कोल्हापूरच्या ओल्या दुष्काळात आपण खूप मदत केली होती, आता मराठवाड्यातल्या ओल्या दुष्काळात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे.” यापुढे ते एक पोस्टर शेअर करीत त्यावरील नंबर दाखवत, त्यावर फोन करण्याचे आवाहन सगळ्यांना करतात.

यापुढे ते म्हणतात, “‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ही ओळ लक्षात ठेवा. ज्यांना मदत करायची आहे आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी हा नंबर लक्षात ठेवा. हा नंबर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ३६ पैकी ३१ जिल्हे बाधित झाले आहेत. १९५ तालुक्यातील २७ लाख शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमची विनंती आहे की, तुम्ही हा नंबर लक्षात ठेवा. आता मदत नसेल, पण पुढे कधीही गरज लागल्यास या नंबरवर संपर्क साधा. प्रशासन, शासकीय अधिकऱ्यांच्या सहाय्याने आपण ही मदत करत आहोत.”

प्रवीण तरडेंनी शेअर केलेला व्हिडीओ

यानंतर ते सर्वांना आवाहन करीत म्हणतात, “आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करू. सगळ्यांनी या नंबरवर संपर्क साधा आणि याद्वारे मदतही करा.” दरम्यान, प्रवीण तरडेंच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे. “सर खूपच भारी काम करताय; शेतकरी आपला सदैव ऋणी राहील”, “खूप छान”, “दादा उत्तम काम” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.