एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळलं. सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २९ जून रोजी जनतेशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. फक्त सामान्य लोक नव्हे तर कलाकार मंडळी देखील याबाबत आपलं मत मांडताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “महाराष्ट्राची जनता जिंकली”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आरोह वेलणकरचं ‘ते’ ट्विट चर्चेत

काही मराठी कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियाद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे. तर काहींनी भावूक ट्विट करत उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे, धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब अशा शब्दांमध्ये कलाकारांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी ट्विट केलं. पण बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेलं ट्विट मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.

शर्लिन चोप्राचं ट्विट चर्चेत
शर्लिनने दोन ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये तिने म्हटलं की, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.” या ट्विटनंतर तिने आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटलं की, “अखेरीस” तिच्या या ट्विटमुळे अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – “खरंच वाईट वाटतंय कारण…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमे झाला भावूक

एका युजरने म्हटलं की, “तू मुख्यमंत्री बनणार का?” शर्लिनच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात शिवसेनेनं बंडखोर १६ आमदारांना निलंबित केल्याची याचिका न्यायप्रविष्ठ असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. या बहुमत चाचणीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देताना उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये बुधवारी उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.