मुंबई, ठाण्यासह महापालिका निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. ३१ जानेवारी २०२६ च्या आत निवडणुका घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एकीकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांमधली रंगत वाढली आहे. तर दुसरीकडे महायुती म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे). राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असे तीन पक्ष आहेत. मुंबईत महायुतीचा विजय होणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांमधले घोळ समोर आणले आहेत. १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाला दणका देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आज मागाठाणे या ठिकाणी महेश कोठारे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

महेश कोठारे यांच्याकडून भाजपाचं कौतुक

मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाचं कौतुक केलं. भाजपा म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं महेश कोठारे म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.

काय म्हणाले महेश कोठारे?

आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल. असं महेश कोठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपाने आता मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या कार्यक्रमाला भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, प्रवीण दरेकर यांच्यासह महेश कोठारे उपस्थित होते.

मी मोदींचा भक्त आहे, भाजपाचा भक्त आहे-महेश कोठारे

दिवाळी पहाट २०२५ च्या कार्यक्रमांमध्ये महेश कोठारे यांनी मी मोदीजींचा भक्त आहे असे विधान केलं. तसंच त्यांनी पुढे असंही म्हटलं की मी भाजपाचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल… निवडणुकीदरम्यान सुद्धा महेश कोठारे यांनी भाजपच्या वतीने समर्थन दर्शवले होते. यावेळी कार्यक्रमात ते म्हणाले की जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहे. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.