Bollywood Actress Mahima Chaudhry Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीत ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. महिमा चौधरीने आपल्या करिअरमध्ये ४२ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महिमाने १९९० मध्ये ग्लॅमरस जगात प्रवेश केला, तिने पहिल्यांदा मॉडेलिंग सुरू केले आणि याच काळात तिला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
महिमाने १९९७ मध्ये ‘परदेस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की तिने अभिनयात करिअर करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. नंतर तिला पश्चात्तापदेखील झाला. तिने सुभाष घईं यांच्याबरोबर पहिला चित्रपट केला आणि घईंच्या आग्रहास्तव तिला तिचे नाव बदलावे लागले. महिमाचे खरे नाव रितू होते, परंतु अंधश्रद्धेमुळे सुभाष घईंनी तिचे नाव बदलले.
महिमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘परदेस’ चित्रपटासाठी अनेक मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते, परंतु कोणालाही सिलेक्ट केले नाही. मग एके दिवशी सुभाष यांनी महिमा म्हणजेच रितू चौधरीला एका पार्टीत पाहिले आणि त्यांना तिचा निरागस चेहरा इतका आवडला की त्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली.
पण, सुभाष घईंचा असा विश्वास होता की ज्या अभिनेत्रीचे नाव ‘म’ ने सुरू होते त्या अभिनेत्रींसह त्यांचे चित्रपट हिट होतात. यापूर्वी त्यांनी माधुरी दीक्षित आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्याबरोबर ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. त्यामुळे महिमानेही त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला नाही आणि तिने तिचे नाव रितू वरून महिमा चौधरी असे बदलले.
दिग्दर्शकाची ही युक्ती कामी आली आणि महिमा चौधरी तिच्या पहिल्याच चित्रपटाने स्टार बनली. तिचा चित्रपट हिट झाला. त्यावेळी महिमा तिच्या नवीन नावाने खूश होती, पण नंतर तिला पश्चात्ताप झाला. एका मुलाखतीत महिमा म्हणाली होती की, करिअरसाठी तिचे नाव बदलणे हा तिच्यासाठी एक कठीण निर्णय होता. ती म्हणालेली की अनेक वर्षांपासून ती ‘महिमा’ म्हणून ओळखली जात होती, परंतु नंतर तिला जाणवले की तिला तिचे खरे नाव जास्त आवडते.
२००० साली तिला भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांच्याशी प्रेम झाले. पेस त्या काळात आपल्या करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर होते. दोघांची भेट झाली आणि नातं सुरू झालं. तीन वर्षे त्यांच्या नात्यात सगळं सुरळीत सुरू होतं पण २००३ मध्ये लिएंडर पेस यांचे प्रसिद्ध मॉडेल रिया पिल्लई हिच्याबरोबर संबंध असल्याच्या अफवा पसरल्या. रिया त्या काळात संजय दत्तची पत्नी होती. महिमा यांनी एकदा लिएंडर यांना रियाशी फोनवर बोलताना पकडलं आणि त्यानंतर त्यांनी नातं संपवलं.
यशाच्या शिखरावर असतानाच ती २००६ मध्ये बॉर्बी मुखर्जी यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकली. बॉबीचे आधीच लग्न झाले होते आणि तो दुसऱ्या विवाहाचा विचार करत होता. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी १९ मार्च २००६ रोजी लास वेगासमध्ये गुपचूप विवाह केला. नंतर २३ मार्चला बंगाली परंपरेनुसार पुन्हा विवाह सोहळा पार पडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली जेव्हा माध्यमांनी तिचा बेबी बंप पाहिला. महिमा चौधरी लग्नाआधीच गरोदर होती. २००७ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु, वैयक्तिक मतभेदांमुळे अवघ्या ७ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. २०१३ मध्ये ते दोघं विभक्त झाले. २०२२ मध्ये अभिनेत्रीला कर्करोगाचं निदान झालं. या घटनेनंतर महिमाच्या करिअरला ब्रेक लागला.
महिमाने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘परदेस’ (१९९७), ‘धडकन’ (२०००), ‘दाग: द फायर’ (१९९९), ‘दिवाने’ (२०००), ‘खिलाडी ४२०’ (२०००), ‘दिल क्या करे’ (१९९९), ‘लज्जा’ (२००१), ‘कुरुक्षेत्र’ (२०००), ‘ओम जय जगदीश’ (२००२), ‘बागबान’ (२००३) आणि अलीकडील ‘इमर्जन्सी’ (२०२४) यांचा समावेश आहे.