नुकताच ‘दशावतार’ हा चित्रपट गाजला. याच दशावतारावर आधारित आणि त्यातल्या गमतीजमतींवर बेतलेले मालवणी बोलीतले ‘वस्त्रहरण’ हे नाटककार गंगाराम गवाणकर यांचे नाटक १९७५ सालापासून आजतागायत हाऊसफुल्ल गर्दीत जवळजवळ साडेपाच हजार प्रयोगांचा पल्ला गाठून भरधाव वेगाने सुरूच आहे. या वाटचालीत त्याने अनेकानेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

गंगाराम गवाणकर हे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असतानाच त्यांनी लिहिलेल्या ‘आज काय नाटक होवचा नाय’ या एकांकिकेपासून सुरू झालेल्या ‘वस्त्रहरण’च्या प्रवासाने सुरुवातीस अनेक टक्केटोणपे खात पुढे थेट लंडनवारी गाजवण्यापर्यंत घोडदौड केली. सुरुवातीला हे नाटक अपयशी ठरले होते. याचे कारण यातली ‘नाटकातले नाटक’ ही संकल्पनाच ते करणाऱ्यांना नीटशी कळली नव्हती. पण मिच्छद्र कांबळी यांना या नाटकाबद्दल इतका आत्मविश्वास होता, की ते एक ना एक दिवस यशस्वी होणारच ही त्यांना शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे ते यशस्वी होईपर्यंत त्यांनी ‘वस्त्रहरण’चा पिच्छाच पुरवला आणि या नाटकाने पुढे खरोखरीच इतिहास घडवला.

‘वस्त्रहरण’ची गंमत म्हणजे त्याच्या पहिल्या प्रयोगात मिच्छद्र कांबळी नव्हते. ज्या दिवशी शुभारंभाचा प्रयोग होणार होता त्या दिवशी सूर्यग्रहण होणार असल्याचे लक्षात आले. आणि ते अशुभ असल्याने ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी नाटकाचा शुभारंभ करायचे ठरले. पण त्या दिवशी मिच्छद्र कांबळी यांच्या ‘महासागर’ नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. त्यामुळे ते या प्रयोगात उपलब्ध नव्हते. मग तोडगा असा काढण्यात आला की, स्वत: लेखक गंगाराम गवाणकरांनीच पहिल्या प्रयोगात तात्या सरपंचांची भूमिका करायची. त्याप्रमाणे ते प्रयोगात उभे राहिले आणि शुभारंभाचा प्रयोग पार पडला. आणि नंतर मिच्छद्र कांबळी ‘वस्त्रहरण’चा भाग झाले. नाटक लोकांना आवडत होते, परंतु म्हणावे तसे बुकिंग त्याला होत नव्हते. शेवटी पुण्यात प्रयोग करून हे नाटक थांबवायचे असे ठरले. आणि नेमके त्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, सुनीताबाई देशपांडे आले होते. महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदाने हसवणाऱ्या पुलंसमोर नाटकाचा प्रयोग करायचा याचे दडपण साहजिकच सर्वावर आले होते. परंतु हा प्रयोग इतका रंगला की पुलंनी रंगपटात येऊन गवाणकरांसह सगळय़ांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. नंतर गवाणकरांना एक खुशीपत्र लिहून भरभरून लेखी पोचपावतीही दिली.

पु. ल. देशपांडे यांनी ‘हे नाटक पाहून हसता हसता जे जे अवयव दुखू शकतात ते दुखताहेत. मला हे नाटक बघण्यापेक्षा यात छोटीशी भूमिका करायला मिळाली असती तर अधिक बहार आली असती!’ या आशयाचे उद्गार काढत ‘मराठी रंगभूमीवरचा अस्सल देशी फार्स’ अशी ‘वस्त्रहरण’वर स्तुतीसुमने उधळली होती. आणि मग काय, बुकिंगअभावी बंद पडता पडता ‘वस्त्रहरण’ अक्षरश: उसळले आणि धो-धो धावायला लागले. ‘वस्त्रहरण’ने केवळ मालवणी नाटकांचीच रंगभूमीवर लाट आणली नाही, तर मालवणी खाद्यसंस्कृतीही त्याने महाराष्ट्रभर रुजवली. इतकी, की पंचतारांकित हॉटेलांतही मालवणी सागुती वडे जाऊन विराजमान झाले. ‘मालवणी याड’ म्हणून तोवर हिणवल्या जाणाऱ्या मालवणी माणसाची मानही ‘वस्त्रहरण’ने ताठ केली. आणि याचे कर्तेधर्ते होते सर्वस्वी गंगाराम गवाणकर आणि मिच्छद्र कांबळी. तोवर अनेक नाटकांतून किरकोळ भूमिका करणाऱ्या मिच्छद्र कांबळी यांची मालवणी नाटकांचा अनभिषिक्त सम्राट अशी नाममुुद्रा ‘वस्त्रहरण’ने मराठी रंगभूमीवर उमटविली. त्यातूनच त्यांनी आपली ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ ही निर्मिती संस्था सुरू केली. त्यांची ही लोकप्रियता एवढी कळसाला पोहोचली होती की त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली. एखादी बोलीभाषा मराठी रंगभूमीवर रुजवण्याचे मोठे काम ‘वस्त्रहरण’ने केले. इतका भलाथोरला इतिहास मालवणी ‘वस्त्रहरण’ने घडवला होता. मात्र गंगाराम गवाणकरांनी पुढच्या काळात ‘वडाची साल िपपळाक’ हे एकमेव नाटक वगळता मालवणी नाटकांचे दळण कायम दळले नाही. त्यानंतर ‘चाकरमानी’, ‘केला तुका झाला माका’, ‘येवा कोकण आपलाच आसा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’सारख्या मालवणी नाटकांची एकच लाट आली; पण ती इतर लेखकांची होती. महाराष्ट्रातील एका बोलीतील नाटकांची अशी लाट यापूर्वी कधीच आली नव्हती. पुढच्या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा भागांतील कलाकार मुंबईत आले आणि त्यांनी नाटक, सिनेमा, सीरियल्समधून आपापल्या बोलींना काहीएक स्थान मिळवून दिले, त्यांची गोडी शहरी रसिकांना लावली, हा अगदी अलीकडचा इतिहास झाला.

राजापूर तालुक्यातील माडबन या गावातून अत्यंत खडतर परिस्थितीत शालेय शिक्षणासाठी मुंबईत आलेले किशोरवयीन गंगाराम गवाणकर फूटपाथवर राहून, स्मशानात अभ्यास करून, जगण्यासाठी बारीकसारीक नोकऱ्या करत सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्याशी संघर्ष करत होते.

कोकणी मातीचे आणि तिथल्या नाटकांचे संस्कार बालपणीच झाल्यामुळे सतत नाटकाचा किडा त्यांच्या डोक्यात वळवळत असे. त्यातूनच पुढे ते नाटय़लेखनाकडे वळले. आणि ज्या मुंबई विमानतळावर बालमजूर म्हणून त्यांनी काम केले होते, त्याच विमानतळावरून त्यांनी ‘वस्त्रहरण’ घेऊन लंडनला झेप घेतली होती. परंतु ते ‘वस्त्रहरण’च्या यशात मग्न राहिले नाहीत. त्यांनी ‘वन रूम किचन’ आणि ‘वात्रट मेल’’सारखी हजार, अडीच हजार प्रयोगसंख्येची नाटकेही रंगभूमीला दिली. त्यांनी १६-१७ नाटके लिहिली. आपले कनिष्ठ मध्यमवर्गीय जगणे, त्यातले तिढे, पेच, त्यातला संघर्ष हेच त्यांनी मुख्यत्वेकरून आपल्या नाटकांचे विषय बनवले. पण त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मात्र तक्रारीचा न राहता मिश्किल, विनोदी राहिला. ‘वन रूम किचन’ हे खरं तर त्यांची स्वत:चीच मुंबईत घर घेताना झालेली असह्य फरफट चित्रीत करणारे नाटक आहे. ‘वात्रट मेले’ हेही त्यांना भेटलेल्या चिवित्र माणसांवरचे नाटक आहे. त्यांचे आयुष्य इतक्या चित्रविचित्र वळणांनी घडलेले होते आणि त्यांना इतक्या भिन्न भिन्न वृत्ती-प्रवृत्तींची माणसे आजवर भेटली होती, की त्यांना त्यांनी आपल्या विलक्षण निरीक्षणशक्तीद्वारे टिपकागदासारखे टिपले होते. त्यामुळे त्यांना लेखनासाठी वेगळय़ाने विषय शोधावे लागले नाहीत.

आपल्याला आयुष्यात यश कधीच सहजासहजी मिळाले नाही, तर त्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागले आणि तसेच कष्ट व हालअपेष्टा सोसत आपली नाटकेही तरली, यशस्वी झाली असे ते म्हणत. त्यांचे ‘व्हाया वस्त्रहरण’ हे आत्मकथन राम नगरकरांच्या ‘रामनगरी’ या विक्रमी आत्मकथनासारखेच हलकेफुलके, खुसखुशीतपणे उतरले आहे. त्यांना चार्ली चॅप्लिनवरही नाटक लिहायचे होते. परंतु त्यांचा हा संकल्प मात्र अधुराच राहिला. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारीत ‘चित्रांगदा’ हे नृत्यनाटय़ही लिहिले. आपल्या महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. त्यांतील नाटकेदेखील रंगभूमीवर यायला हवीत, त्यांचा आस्वाद रसिकांना घेता यायला हवा असे गंगाराम गवाणकर यांना वाटत होते. त्यातूनच बोलीभाषेतील एकांकिकांची कल्पना पुढे आली. त्यांनी आपली ही कल्पना निर्माते गोिवद चव्हाण यांना सांगितली आणि त्यांनी ती उचलून धरली.

आज ही बोलीभाषेतील एकांकिकांची स्पर्धा चांगलीच मूळ धरून आहे. त्यातून निरनिराळय़ा मातीतले लेखक आपल्या बोलीभाषा घेऊन पुढे येत आहेत. गवाणकरांनी अनेक वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही केले. त्यांच्या आजवरच्या लेखन कारकीर्दीचा गौरव करणारे नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. अलीकडच्या काळात ते आपल्या माडबन या गावी येऊन जाऊन असत. त्यांची लेखनऊर्मी अजूनही ताजी, तरुण होती. त्यांच्या भेटीत लेखनाचे अनेक संकल्प त्यांच्या बोलण्यात येत. मात्र आता अचानक त्यांची लेखणी वयोमानानुरूप कायमस्वरूपी थबकली आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.