आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर कायमस्वरूपी ठसा उमटवलेला गंभीर प्रवृतीचा कलाकार म्हणून अभिनेते निळू फुले यांना ओळखले जाते. १३ वर्षांपूर्वी १३ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांनीही निळू फुले यांची एक खास आठवण सांगितली. यावेळी त्यांनी याबाबत एक पोस्टही शेअर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी निळू फुलेंसोबतचे एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी त्यांचे चित्रपटातील अनेक फोटोदेखील शेअर केले आहे.

“सत्ता बळकावणार्‍याला नाही तर…”, अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

“…निळूभाऊ कधीबी अचानक माझ्या सातारच्या घरी यायचे ! मी लहान नट. पन लै आरामात गप्पा मारायचे माझ्याशी. आपल्या मोठेपनाचं समोरच्यावर कुठलंबी दडपन येऊ न देनारा दिलखुलास मानूस. पं. सत्यदेव दूबेजींच्या वर्कशाॅपनंतर पुण्यात माझा एक कवितावाचनाचा कार्यक्रम झाला. तो बघायला निळूभाऊ आलेवते. तवापास्नं का कुनास ठावूक? भाऊ कायम माझ्या संपर्कात राहीले. लै भारी गप्पा व्हायच्या. पन ते सातारला माझ्याकडं आले किंवा मी पुण्यातल्या त्यांच्या घरी गेलो काही क्षण मी भारावल्यासारखा असायचो. मला खरंच वाटायचं नाय, साक्षात निळू फुले माझ्याशी बोलत्यात ! माझं मन लै लै लै मागं जायचं… मायनीतल्या ‘गरवारे टुरींग टाॅकीज’च्या तंबूत…

१९८० नंतरचा काळ… तंबू थेटरमध्ये ‘शनिमा’ बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी ! …कारन पडद्यावर ‘कर्रकर्रकर्र’ असा कोल्हापूरी चपलांचा आवाज करत ‘त्यानं’ एन्ट्री घेतलेली असायची.. बेरकी भेदक नजर – चालन्याबोलन्यात निव्वळ ‘माज’ – नीच हसनं… शेजारी बसलेल्या माझ्या गांवातल्या अडानी आया-बहिनी रागानं धुसफूसायला लागायच्या.. सगळीकडनं आवाज यायचा : “आला बया निळू फुल्या..! मुडदा बशिवला त्येचा. आता काय खरं न्हाय.”

…थेटरमधल्या शांततेला चिरत त्यो नादखुळा आवाज घुमायचा “बाई,आवो आपला सोत्ताचा यवडा वाडा आस्ताना तुमी त्या पडक्यात र्‍हानार? ह्यॅS नाय नाय नाय नाय बाईSS तुमाला तितं बगून आमाला हिकडं रातीला झोप न्हाय यायची वो” आग्ग्गाय्य्यायाया…अख्ख्या पब्लीकमध्ये तिरस्काराची एक लाट पसरायची…

१९९० नंतरचा काळ…काॅलेजला मायणीवरनं सातारला आलेला मी. अभिनयाकडं जरा सिरीयसली बघायला सुरूवात झालेली… जुन्या क्लासिक मराठी-हिंदी-इंग्रजी फिल्मस् पाहून अभिनयवेड्या मित्रांशी तासन्तास चर्चा – ‘अभ्यास’… अशात एक दिवस ‘सिंहासन’ बघितला ! त्यात निळूभाऊंनी साकारलेला पत्रकार दिगू टिपणीस पाहून येडा झालो !! ‘सामना’ मधला हिंदूराव पाटील… ‘पिंजरा’ मधला परीस्थितीनं लोचट-लाचार बनवलेला तमासगीर..’एक होता विदूषक’ मधला सोंगाड्याच्या भूमिकेचं मर्म सांगणारा लोककलावंत.. आईशप्पथ ! केवढी अफाट रेंज !

‘सखाराम बाईंडर’ नाटक वाचल्यानंतर भाऊंनी सखाराम कसा साकारला असेल ते इमॅजीन करायचो कायम. अजूनबी करतो. पुढं ते जेव्हा कधी भेटले, तेव्हा मी मुद्दाम बाईंडरचा विषय काढायचो आणि ‘जीवाचा कान’ करून त्यांना ऐकायचो. जो काही छोटासा सहवास लाभला त्यात या महान अभिनेत्यानं ‘जगणं’ शिकवलं.. आपली मराठी इंडस्ट्री कशी आहे.. मला पुढं जाऊन काय त्रास होऊ शकतो.. याचं भाकित भाऊंनी त्यावेळी केलं होतं ! मी तरीबी हार न मानता, या त्रासाला कसं उत्तर देत संघर्ष करायची गरजय, याचा कानमंत्रबी दिला होता. त्याचा आज लै लै लै उपयोग होतोय.

परीपूर्ण ‘नट’ कसा असावा? असा प्रश्न कुनी विचारल्यावर माझ्या डोळ्यापुढं मराठीतलं एकमेव नांव येतं – निळू फुले ! नटानं आपल्या भवताली घडणार्‍या छोट्यामोठ्या घटना, राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा, साहित्य सगळ्या-सगळ्या गोष्टींबद्दल भान ठेवायला पायजे हे निळूभाऊंकडनं शिकलो. सशक्त नट घडतो तो भवतालाच्या वाचनातूनच. मी प्रत्यक्ष भेटल्यावर ‘मानूस’ म्हनून भाऊंच्या जास्त प्रेमात पडलो.

भाऊ, आज १३ जुलै. तुम्हाला जाऊन तेरा वर्ष झाली. पुणे-सातारा हायवेवर वेळेजवळ अजून तुमचा फोटो असलेलं होर्डींग झळकत असतं… त्यावर लिहीलंय : ‘मोठा माणूस’ !”, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

“…मला खूप भरुन येतंय”, अभिनेते किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहे. होर्डिंग पण तितक्याच उंचीच आहे जिथ कोणी पोहचू शकत नाही ‘मोठा माणूस’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. विनम्र अभिवादन… खरंच मोठा माणूस!! असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane share facebook post talk about nilu phule memories nrp
First published on: 14-07-2022 at 14:37 IST