स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर एकच गदारोळ सुरु झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे किरण माने यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येत त्यांची भूमिका मांडली. किरण माने यांच्यासोबत काम करताना त्यांनी कधीही गैरवर्तन केलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर किरण माने यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी काही कलाकारांचे आभार मानले आहेत.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट

“बघा, विचार करा. जरी तुम्हाला खरा किरण माने माहिती असला तरी ही रिस्क आहे.. प्राॅडक्शन हाऊस नाराज होणं परवडणारं नसतं आपल्या क्षेत्रात !” त्यावर या सगळ्या म्हणाल्या, “सर, आत्ता तुमच्यावर जे आरोप होताहेत ते पाहून आम्हाला खूप वेदना होताहेत. आम्हाला माहीतीयेत खरे किरण माने. आज आम्ही तुमच्या बाजूनं उभे नाही राहीलो तर आम्हाला रात्री झोप लागणार नाही. आम्हाला समाधानाची झोप महत्त्वाची आहे. कामाचं काय होईल ते होईल.”… “तरीही अजून एकदा विचार करा.” त्यावर त्या म्हणाल्या, “सर ! प्रामाणिकपणानं आणि सच्चाईनं वागून त्याचं फळ म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकणार असतील, तर एखादं स्नॅक्स सेंटर काढू आणि आनंदानं चालवू…पण अन्याय आणि खोटं सहन नाही करू शकत.”

…मला खूप भरुन येतंय भावांनो… आमच्या सिरीयलमधल्या ज्या-ज्या महिला माझ्या बाजूनं उभ्या राहिल्या, त्या अत्यंत उत्स्फूर्तपणे पुढे आल्या ! बर्‍याच जणांना वाटतं मी ब्राह्मण द्वेष्टा आहे ! नाही. माझ्या जवळचे लोक तुम्हाला सांगतील, मी जातवर्चस्ववाद्यांचा तिरस्कार करतो, कुठल्या जातीचा नाही !! माझ्या पोस्ट मध्ये चिन्मय-तन्मय दिसले की हे जातवर्चस्ववादी ओरडतात “बघा, हा ब्राह्मणद्वेष करतो.” …पण त्याच पोस्टमध्ये शेवटी मानवतेचा संदेश देणारे डाॅक्टर ‘सहस्त्रबुद्धे’ असतात, हे सगळे सोयीनं विसरतात… माझ्या पाठीशी उभ्या राहीलेल्या आणि विरोधात बोलणार्‍यांमध्ये जो फरक आहे, तोच फरक जात आणि जातवर्चस्ववाद्यांमध्ये आहे !!!

एवढ्या गदारोळात अनिता दाते-केळकर, प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शितल गीते आणि गौरी सोनार यांनी जे सत्व आणि स्वत्व दाखवलं याला तोड नाही ! जगात स्त्रीचा सन्मान केला जातो, तो अशाच नितळ-निर्मळ आणि पारदर्शी वृत्तीच्या भगिनींमुळे… लब्यू पोरींनो, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ खास गोष्टीवर नात नव्या नंदाची नजर, म्हणाली…

नेमकं प्रकरण काय?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असायचे. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते होती.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah mulgi zali ho serial actor kiran mane new facebook post goes viral nrp
First published on: 18-01-2022 at 12:37 IST