Milind Gawali post on his mothers birthday : ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे मिलिंद गवळी. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारली.
मिलिंद गवळी यांनी साकारलेली अनिरुद्ध ही भूमिका खूप गाजली. बायकोवर हक्क गाजविणारा अहंकारी अनिरुद्ध अनेकांना आवडला. नुकतीच मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद गवळींच्या या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मिलिंद गवळी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी आईबरोबरचे बालपणीचे फोटो टाकले आहेत. मिलिंद गवळी यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं, “आईविना मला करमत नाही” आपल्याला कोणी नसलं तरी चालेल; पण आपल्याला आई पाहिजे. प्रत्येकाला आई असतेच. त्याशिवाय आपण जन्मालाच येऊ शकत नाही. मला कळायला लागल्यापासून माझी आई आजूबाजूला सतत असायची. आईशिवाय माझं पानच हलायचं नाही. ती घास भरवायची म्हणून मी जेवायचो. ती सकाळी उठवायची म्हणून मी उठायचो. ती मला अंघोळ घालून शाळेचे कपडे घालून शाळेच्या बसमध्ये बसवून द्यायची म्हणून मी शाळेत जायचो. ती अभ्यास करायला सांगायची म्हणून मी अभ्यास करायचो. माझ्या माऊलीला बिचारीला मला शिकवायला यायचं नाही म्हणून तिनं माझ्यासाठी असंख्य शिकवण्या ठेवल्या, मला शिकवायला ट्युशन टीचर घरी आल्या की, ती किचनमध्ये त्यांच्यासाठी चांगलंचुंगलं खायला बनवायला जायची, त्यांचं खाऊन मन भरलं की, ते मला चांगलं शिकवतील, अशी तिची भाबडी समजूत होती. माझ्या माऊलीला कुठे माहीत, शिकवायला आलेले सर तिच्या हातचं चविष्ट खाल्ल्यानंतर मला म्हणायचे, “मी जरा थोडा वेळ पडतो” आणि ते झोपले की, मी गोट्या, भवरे, पतंग, गल्लीत क्रिकेट खेळायला पळायचो.”
पुढे मिलिंद गवळींनी लिहिलं, “आई असताना मी आनंदात सुखात माझं आयुष्य जगत होतो, जगाशी माझं देणं-घेणं नव्हतं; पण काहींना माझं सुख बघवत नव्हतं. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची त्यांना गोडीच लागली होती. काहीही कारण नसताना काही बायका घरी यायच्या, बिचाऱ्या माझ्या आईला विचारायच्या, “अहो, सुशीताई झाला का हो तुमचा मिलू पास, किती मार्क मिळाले त्याला?” अरे, तुम्हाला काय करायचं आहे. आई बिचारी सारवासारव करायची. ‘यावेळी मार्क थोडे कमी पडले आहेत; पण पुढच्या वेळी त्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील’. आईनं कधी आशा नाही सोडली. फार साधी होती माझी आई. खूप प्रेमळ, खूप मायाळू”.
“ती माझ्या पाठीशी कायम उभी होती म्हणून मी स्वच्छंद होतो. आई असेपर्यंत मी कोणालाच कधीही घाबरलो नाही. आई असेपर्यंत कधी भविष्याची चिंता केली नाही. मला आठवत नाही की, आई असेपर्यंत मला कधी भूकपण लागली असेल. सुगरण होती माझी आई. कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नाही की, आईशिवायही आपल्याला जगावं लागेल. आई मला कधीतरी कायमची सोडून जाईल याची मला जरा जरी कल्पना असती, तर कदाचित तेव्हाच मी एक वेगळा माणूस झालो असतो. ती गेल्यानंतर भीती काय असते ते कळायला लागले. आईचं नि:स्वार्थी प्रेम हे जगात कुठेही मिळत नाही हेही कळायला लागलं, मी जे प्रामाणिक काम-कष्ट आता करतोय ते तेव्हाच ती असताना का नाही केले याची मनामध्ये खंत वाटत असते. आता मंदिरात देवींच्या मूर्तींमध्ये मला तिचा भास होत असतो. हे कायम आपल्या जवळच आहे, असंही वाटतं. २१ जून आज तिचा वाढदिवस”, असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.
मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर पाच वर्षं अधिराज्य गाजवलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत त्यांची एन्ट्री झाली. या मालिकेत मिलिंद गवळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले.