मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीशी जोडलेला प्रसिद्ध फोटोग्राफर स्वप्नील रास्तेने त्याच्या जीवाला धोका असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
स्वप्नील रास्तेने आतापर्यंत अनेक मराठी कार्यक्रमांचे इव्हेंट मॅनेजमेंट, सूत्रसंचालन केले आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर म्हणूनही त्याला ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचे फोटोशूट स्वप्नीलने केले आहे. मात्र आता त्याच्या या फेसबुक पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा : “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडणार…”, प्रवीण तरडेंकडून ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर
स्वप्नील रास्तेची पोस्ट
“मी कला, मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्रात काम करणारा एक कलाकार व इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायिक आहे. माझ्यावर कुठलंही कर्ज नाही व मी कोणाचंही कुठलंच देणं लागत नाही. इव्हेंट झाल्यावर वा शूट पूर्ण झाल्यावर कलाकार / तंत्रज्ञ व इतर सर्वांचं ठरलेलं पूर्ण मानधन तत्क्षणी माझ्या कंपनीच्या वा स्वतःच्या खात्यातून देऊन टाकणारा मी एक प्रामाणिक व्यवसायिक आहे. पण काम करून घेऊन माझ्या कष्टाचे कोटी नसले तरी लाखो रुपये कात्रज (पुणे) भागातील एका राजकारण्यानी बुडवलेत. स्वतःला स्वामीभक्त म्हणवणाऱ्या ह्या माणसाने देतो देतो करत स्वामींचं नाव घेऊन घेऊन ते बुडवलेत. तो आर्थिक दृष्टया पूर्णपणे सधन आहे किंबहुना गडगंज श्रीमंत आहे असं म्हणायला ही हरकत नाही. पण मी अजूनही त्या बुडवलेल्या पैशासाठी लढतोय कारण कागदोपत्री नोंद न ठेवता त्यावेळी केवळ विश्वासावर काम माझ्याकडून घेतलं गेलं व केलं गेलं होतं. त्याला जवळपास आता ७ वर्ष होत आली आहेत. माझे लाखो रुपये त्याच्याकडून अजून येणं आहे. एकदम सगळे शक्य नसतील तर हळू हळू द्या असं वारंवार सौम्य भाषेत मागून देखील त्यावर कुठलीही सकारात्मक कृती त्याच्याकडून आजवर नाही.
मी अनेकदा त्यांना विनंती केली, माझी कौटुंबिक सदस्य ह्या नात्याने माझ्या पत्नीने देखील केली. तिच्याशी बोलण्याची भाषा देखील अंशी निगरगट्टपणाचीच होती. मी वेळोवेळी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न देखील केला पण आमच्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संभषणावरून आता मात्र मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्या माणसाकडून जिवाला धोका संभवतो, घातपाताची शक्यता संभवते, सूड भावनेने हल्ल्याची शक्यता वा अपहरणाची शक्यता सुध्दा संभवते, खोट्याचा आधार घेऊन कुठल्यातरी सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ही हा माणूस सहज करू शकतो, त्यामुळें मी झालेल्या फसवणुकीची यथायोग्यपणे माहिती त्याचा खरा चेहरा जगासमोर येईल अशा काही संभाषणाच्या पुराव्यासह माझ्या जवळच्या काही आप्तेष्टांकडे अपूर्ण का होईना पण आहेत त्या पुराव्यांसह देऊन व लिहून ठेवली आहे.
कारण माझ्या जिवाचं काहीही बरं वाईट हा माणूस नक्की करू शकतो. माझ्यावर कुठलंही कर्ज वा कोणाचंच कुठलंही देणं नसताना देखील माझ्या कष्टाच्या लाखो रुपयांवर त्या व्यक्तीने डल्ला मारल्याचे विचार मनांत येऊन मी अनेकदा डिप्रेशनच्या दारात जाऊन परत येतोय. पण लढण्याचा प्रयत्न अजूनही सोडवत नाहीय. मी रास्ते घराण्याशी नातं जोडतो त्यामूळे लढत नक्की राहणार. सहजपणे ही तक्रार नोंदवावी की नाही याबद्दल मी साशंक आहे, कारण लिखापडीत न ठेवता मी केवळ आधी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे विश्वासावर काम घेतलं होतं आणि पूर्ण केलं होतं. परवाच्या नितीन देसाईंच्या घटनेमुळे अचानक विचार मनात येऊन आपल्यांचा थोडा आधार वाटावा व व्यक्त व्हावं व हा ही एक पुरावा ठेवावा ह्या भावनेने केवळ ही पोस्ट स्वतःच्या सर्व accounts वर लिहीत आहे. मी पूर्णपणे भानावर व stable आहे. काळजी नसावी फक्तं साथ असावी कारण मी ही आजवर भरपूर काम केलं आहे, अनेकांना वेळोवेळी काम दिलेलं ही आहे व त्याचा ठरलेला मोबदला ही दिलेला आहे कुठलीही वेळ न दवडता.
कायद्याने कदाचित् शिकवता येत नसेल तरी नियतीने अशा फसवणूक करणाऱ्या माणसांना नक्की धडा शिकवावा ही अपेक्षा”, असे स्वप्नील रास्तेने म्हटले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान स्वप्नील रास्तेची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. त्यामुळे स्वप्नील हा चर्चेत आला आहे.