सत्य घटनेपासून प्रेरित असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट आज, १ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. सध्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचं खूप कौतुक होतं आहे. हा चित्रपट कसा आहे? याबद्दल शिवराजचा खास मित्र आशय कुलकर्णीने पोस्ट लिहून सांगितलं.
अभिनेता आशय कुलकर्णीने शिवराज वायचळबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “आज संपूर्ण महाराष्ट्रात १ मे म्हणजेच कामगार दिनानिमित्ताने ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक- शिवराज वायचळ…तुझं मनापासून अभिनंदन. पोस्ट लिहिणं अवघड जातंय, शब्द तू समोर असताना जसे सहज पटापट बाहेर येतात तसे काही येईना, पण प्रयत्न करतोय.”
पुढे आशय कुलकर्णीने लिहिलं, “‘आता थांबायचं नाय’चा प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहतोय, माणूस म्हणून तुझ्यातला सच्चेपणा, कलेसाठी तुझं असलेलं प्रेम, जिद्द, चिकाटी आणि तुझे कष्ट याचा अनुभव चित्रपटातल्या प्रत्येक एक प्रसंगातून येत होता. तू जसा आहेस तशीच उत्तम माणसं तू जोडली आहेस. तुझं कौशल्य तुझ्या शांत स्वभावात दडलेलं आहे. यार…‘आता थांबायचं नाय’ ही एका माणसाची गोष्ट नसून चित्रपटात आणि वास्तवात असलेल्या असामान्य माणसांची गोष्ट आहे.”
“स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठीच्या कष्टाची गोष्ट आहे. कुटुंबातील प्रत्येक माणसाचं नुसतंबरोबर असणं आणि त्यांचा आधार असण्याची गोष्ट आहे. एक तरी खमका मित्र आयुष्यात असणं, तो असतोच याची गोष्ट आहे. माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. प्रेरणादायी गोष्ट. ‘आता थांबायचं नाय’ फक्त नव्या / पहिल्यांदाच / नवीन दिग्दर्शकाने केलेला चित्रपट नसून तो मराठी चित्रपटातसृष्टीत, चित्रपटसृष्टीसाठी नवीन उमेद जागवणारा प्रयत्न सुद्धा आहे. यासाठी @zeestudiosmarathi @bavesh123 @tusharhiranandani @dharamv तुम्हा सर्वांचे कौतुक आणि आभार…खूप खूप अभिमान शिवराज मित्रा आता काय? ‘आता थांबायचं नाय’…ता.क : या चित्रपटाचा एक छोटासा भाग मी आहे, जो ओळखेल त्याला @shivrajwaichal कडून चित्रपटाचं तिकीट मिळेल,” असं आशयने लिहिलं आहे.
दरम्यान, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी शिवराजसह ओंकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी सांभाळली होती. या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया यांनी केली आहे.