राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथे झालेल्या सभेत लग्नातील मंत्रावरून वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून तेव्हा चांगलाच वाद झाला होता. कन्यादान करत असताना भटजी जो मंत्र बोलतात, त्यावरून अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं होतं. दरम्यान या सभेत तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंचावर उपस्थित होते. अमोल मिटकरींनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर जयंत पाटील हसले होते. दरम्यान, त्या प्रकरणावरून आता जयंत पाटलांवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव प्रतिक पाटील यांचा विवाहसोहळा दोन दिवसांपूर्वी इस्लामपुरात थाटामाटात पार पडला. त्यानंतर या लग्नातील विधींवरून शरद पोंक्षेंनी टोला लगावला.

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले होते.

मिटकरी भर सभेत हा किस्सा सांगत असताना जयंत पाटील हसले. त्यांच्या मुलाचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकद्वारे एक पोस्ट शेअर करत जयंत पाटील यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.

आणखी वाचा – “न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्यापेक्षा…” शरद पोंक्षेंनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही करताहेत कौतुक

शरद पोंक्षे म्हणाले, “बदल स्वागतार्ह. काही दिवसांपूर्वी लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का? मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकणारे नेते दिसले, म्हणून ही शंका आली.”

आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पोंक्षे यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “का पेटला आहेस मित्रा” असा प्रश्न थेट एका युजरने कमेंटद्वारे शरद पोंक्षे यांना विचारला. यावर उत्तर देत ते म्हणाले, “ईलाज नाही ह्यांचं दुटप्पी वागणं जातीद्वेश निर्माण करणं भयानक आहे रे मग बोलावं लागतं.” दरम्यान, आता शरद पोंक्षे यांच्या विधानानंतर हे नेते प्रतिक्रिया देणार का आणि पुन्हा वाद रंगणार का हे पाहावं लागेल.