‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. ती कमाई बघून आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक खास प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक आर्यनच्या हिंदी चित्रपटाला टक्कर देत ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट दणदणीत कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या अखेरीस एकूण ६.४५ कोटींची कमाई केली. ६.४५ कोटींची कमाई करून पहिल्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा यावर्षीचा मराठी चित्रपट ठरला. याबद्दल एक खास पोस्ट शेअर करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा : “बाल्कनीतलं ब्लॅकचं तिकिट काढून…,” केदार शिंदेंनी वंदना गुप्तेंबद्दल केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या चित्रपटाची उत्तम कामगिरी पाहून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने प्रतिक्रिया दिली. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरीवर केदार शिंदे यांची ही पोस्ट शेअर करत लिहिलं, “किती चांगली बातमी! बायकांनी परत एकदा बॉक्स ऑफिस गाजवलंय. खूप खूप शुभेच्छा. खूप प्रेम. अजून जादू करणार हा सिनेमा.”

हेही वाचा : “आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत कारण…”, सुचित्रा बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत

दरम्यान, हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.