Genelia Deshmukh Loves Marathi Food: अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे चाहत्यांचं लाडकं सेलिब्रिटी कपल आहे. जिनिलीया व रितेश प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. ख्रिश्चन असलेली जिनिलीया मराठमोळ्या रितेशशी लग्न केल्यावर मराठी परंपरा आवडीने जपते. प्रत्येक सणाचे फोटो व व्हिडीओ ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असते.
जिनिलीयाने सासबाईंकडून व घरातील इतर सदस्यांकडून मराठी संस्कृती समजून घेतली. प्रत्येक सण-उत्सव ती मराठी पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे करते. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सून जिनिलीया उत्तम मराठी बोलते. इतकंच नाही तर जिनिलीया उत्तम जेवणही बनवते. तिने स्वतःच याबद्दल सांगितलं होतं.
रितेश देशमुखशी लग्न केल्यावर जिनिलीयाने अभिनयातून ब्रेक घेतला. ती संसारात रमली. तिला दोन मुलं झाली. या दोन्ही मुलांचा सांभाळ जिनिलीयाने केला. याच काळात ती मराठी पद्धतीने जेवण बनवायलाही शिकली. जिनिलीया तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते, त्यामुळे आहाराकडेही ती लक्ष देते. महाराष्ट्रीय पदार्थ खाण्यावर अधिकाधिक भर देत असल्याचं जिनिलीयाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं होतं.
जेवण बनवताना तेल वापरत नाही जिनिलीया
“तू सासूबाईंकडून महाराष्ट्रीय पदार्थ बनवायला शिकलीस का?” असा प्रश्न जिनिलीयाला विचारण्यात आला. त्यावर जिनिलीया म्हणाली, “मला पिठलं, भाकरी व ठेचा खूपच आवडतो. आई (सासूबाई) दर गुरुवारी पिठलं, भाकरी व ठेचा़ बनवतात. मी माझ्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात हे मी अनुभवलं आहे.”
व्हिगन असलेल्या जिनिलीयाला मराठी पदार्थ बनवायला व खायला खूप आवडतात. “पिठल्यामध्येही प्रोटीन आहे. मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा तेल अजिबात वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जेवण बनवते. कारण त्यामध्येच तेल असतं. पुरणपोळी तर मला खूपच आवडते,” असंही जिनिलीया देशमुख म्हणाली होती.