अभिनेते महेश कोठारे यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अजूनही महेश कोठारे यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांनी आता त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. महेश कोठारे यांचं ‘डॅमइट आणि बरंच काही’ पुस्तक प्रकाशित झालं आहे.
आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ
महेश कोठारे यांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबरीने सचिन पिळगांवकर, निवेदिता सराफ यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी आदिनाथ कोठारेच्या पार्टीचं गुपित सचिन पिळगांवकर यांनी उघड केलं.
काय म्हणाले सचिन पिळगांवकर?
“आदिनाथला आम्ही भरपूर छाळायचो. ‘माझा छकुला’ चित्रपट महेश कोठारे बनवत आहे. या चित्रपटात आदिनाथ काम करणार आहे हे मला कळालं होतं. एका कार्यक्रमात आदिनाथ माझ्याकडे धावत आला. मला म्हणाला, सचिन काका मी चित्रपटामध्ये काम करत आहे. मी पण बालकलाकार आहे. त्याचं हे म्हणणं ऐकून मीही म्हणालो मला तुझ्या चित्रपटाचं नाव माहित आहे.”
“‘माझा चकुला’ या चित्रपटात तू काम करत आहेस. तेव्हा तो म्हणाला, नाही नाही असं नाव नाही. त्यानंतर आदिनाथने मला चित्रपटाचं योग्य नाव सांगितलं. अर्थात हे मी त्याला गंमतीने म्हटलं होतं. अशाप्रकारे मी आदिनाथला छळत गेलो. आमच्यासमोरच आदिनाथ वाढत गेला. मोठा होत गेला. मग आमच्या पार्ट्यांमध्ये तो यायचा. पार्टीत हळूच कोपऱ्यात जाऊन त्याने काहीतरी सुरू केलं होतं. ते महेशच्या नजरेत पडलं. पार्टीमध्ये आदिनाथला पाहून महेश ‘आदि…’ असं ओरडला. तेव्हासुद्धा या आवाजाला तो खूप घाबरायचा.” अजूनही आदिनाश त्याच्या वडिलांना घाबरतो असं चित्र या कार्यक्रमात दिसलं.