खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. राजकीय तसेच सामाजिक विषयांवर ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. अमोल कोल्हेंनी आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर विविध फोटो, सामाजिक अनुभव शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमोल कोल्हेंनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
अमोल कोल्हे यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या व्हिडीओला त्यांनी “हे नेमकं काय सुरु आहे? आजचा धक्कादायक अनुभव…” असं कॅप्शन दिलं आहे. यात अमोल कोल्हे म्हणतात, “मुंबईत प्रवास करीत असताना सिग्नल वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी माझी गाडी अडवली. त्यांनी ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितलं. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. यावेळी त्या भगिनीने थेट तिच्या मोबाईलवरील मेसेजच दाखवला- प्रत्येक चौकात २५ हजार रूपयांची वसुली आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं ‘टारगेट’ या भगिनींना देण्यात आलेलं दिसलं.”
हेही वाचा : Video : नव्या घरापाठोपाठ प्रार्थना बेहेरेने मुंबईत घेतलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह जोडीने केली पूजा, पाहा व्हिडीओ
“चला आता आपण एक छोटंस गणित करुयात…मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५०००×६५२ = १,६३,००,०००/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रुपयांची वसूली केली जाते. यामध्ये इतर शहरांच्या वसूलीचा आकडा धरलेलाच नाही बरं का…हे नेमकं काय आणि कशासाठी सुरु आहे? अशा पद्धतीने ‘टार्गेट’ देऊन सर्वसामान्य जनतेची लूट का केली जातेय? याबाबत संबंधित मंत्रीमहोदय किंवा अधिकाऱ्यांनी खुलासा केलाच पाहिजे. वाहतूक शाखा नियमनापेक्षा वसुलीचा अड्डा बनलीय का याची जनतेला माहिती मिळायलाच हवी. ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसूली?” असा सवाल अमोल कोल्हेंनी या व्हिडीओद्वारे उपस्थित केला आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने “तुम्ही स्वतः खासदार आहात तुम्ही या सर्व गोष्टींचा मागमूस काढायला हवा” असं म्हटलं आहे. तर, अन्य काही युजर्सनी “दादा फार वाईट परिस्थिती आहे”, “सामान्य नागरिकांना असाच त्रास सहन करावा लागतोय” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.