Amruta Khanvilkar : मुंबईसह राज्यभरात पावसाचं थैमान सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार दहीहंडी उत्सवानिमित्त विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी शहराबाहेर गेले होते. लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा कार्यक्रमानिमित्त शहराबाहेर होती; नुकतीच ती मुंबईत परतली आहे. भर पावसात प्रवास करताना अतिशय त्रास होतो त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन अमृताने देखील केलं आहे. कारण, मुंबईत लोकल, बस सेवेचा खोळंबा झाला आहे.

अमृता सकाळी विमान प्रवास करून मुंबईत परतली. या प्रवासाविषयी अभिनेत्री सांगते, “साधारण १० वेळा हनुमान चालिसा पठण करून मी पोहोचले आहे. आता इथून घरी जाण्यासाठी कोणाची होडी वगैरे मिळणार आहे का? प्रवास सुरूच आहे…माझी फ्लाइट सकाळी ७ वाजता होती. त्या फ्लाइटने टेकऑफ केलं ९:३० वाजता…त्यानंतर जवळपास पाऊण ते एक तास मी विमानातच होते. आता विमान लँड झालंय…आता विमानतून उतरल्यावर आम्हाला बस मिळालीये, मग सामान मिळणार…त्यानंतर टॅक्सी किंवा रिक्षाने भर पावसात घरी जायचंय. एकंदर काय प्रवास सुरूच आहे.”

“मी सर्वांना एवढंच सांगेन, आज घराबाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या. घरात थांबा” असं अमृताने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. अमृताप्रमाणे अन्य मराठी कलाकारांनी सुद्धा मुंबईकरांना सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तिला ‘चंद्रमुखी’ सिनेमासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तिच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी परदेश दौऱ्यावर गेली होती. आता अमृता नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.