अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जारण’ हा चित्रपट नुकताच ६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील अमृता व अनिता दाते यांच्या भूमिकांनी अनेकांचं लक्ष वेधलं. अशातच अमृता व अनिता यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये अमृताने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. किस्सा सांगताना अमृताने अनिताचं कौतुक केलं आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता म्हणाली,”एक दिवस माझं शूटिंग नसताना मी सेटवर गेले होते आणि मला माहीत होतं की अनिताचं त्या दिवशी शूट आहे. भोर येथील एका वाड्याच्या बाहेर चित्रीकरण सुरू होतं. तो शॉट चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही आहे. काय सुरू आहे बघूया, म्हणून मी सहज तिथे गेले आणि तिथेच थांबले; कारण तेव्हा चित्रपटातील म्युझिक ऐकू येत होतं. ते अनिताच्या चित्रपटातील एन्ट्रीचं म्युझिक आहे. तेव्हा अनिता तिथे आली आणि ती भूमिकेत असल्याने वाकड्या तिकड्या नजरेने बघत होती आणि तेव्हा तिला बघून माझा श्वास थांबला.”
पुढे अमृता अनिताचं कौतुक करत म्हणाली, “एक अभिनेत्री काय जादू करू शकते हे मला त्यावेळी कळलं. ती अभिनेत्री आहे आणि ती तिच्या भूमिकेमध्ये आहे हेसुद्धा मी विसरले होते. मला खूप भीती वाटली होती. तेव्हा जणू तिने माझ्यावर काहीतरी जादूच केली असं मला वाटलं.” पुढे अमृता कलाकारांबद्दल म्हणाली, “चांगलं काम करणारे खूप कलाकार असतात, पण ज्यांचं काम बघून तुमचा श्वास थांबतो असे फार कमी कलाकार असतात. तुम्हाला धडधडायला लागतं. तसं मला अनिताचं काम बघून झालं.” पुढे अमृताने चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांना फोन करून अनिताचं कौतुक केल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित झाला. यामध्ये अमृता सुभाष व अनिता दाते या दोघींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमृता व अनिता यांच्यासह ‘जारण’मध्ये किशोर कदम, सीमा देशमुख, राजन भिसे यांसारखे इतर कलाकारही पाहायला मिळतात.