Amruta Subhash shares photo with Tabu: अभिनेत्री अमृता सुभाष ही तिच्या मराठी-हिंदी चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखली जाते. नुकतीच जारण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
‘जारण’ हा भयपट असून अनिता दाते आणि अमृता सुभाष या प्रमुख भूमिकांत दिसल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता अभिनेत्री तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
अमृताने नुकतीच ‘फिल्मफेअर’मध्ये हजेरी लावली होती. मराठी कलाकारांसह अभिनेत्री तब्बू, राजकुमार राव आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीदेखील हजेरी लावली होती. आता अमृताने सोशल मीडियावर तब्बूसह, नीना कुळकर्णी आणि इतर कलाकारांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
अमृता सुभाष काय म्हणाली?
हे फोटो शेअर करताना अमृताने तब्बूबाबत लिहिले की फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तब्बूला भेटले. ती आपल्या सगळ्यांचीच आवडती अभिनेत्री आहे. पण, ती एक उत्तम माणूसदेखील आहे. आम्हा दोघींना एकत्र काम करायचे आहे. ही इच्छा लवकरच पूर्ण होईल, याची खात्री आहे. माझ्या मनात कृतज्ञता आहे.
पुढे अभिनेत्री असेही म्हणाली, “फिल्मफेअरच्या मंचावर ‘जारण’च्या यशासाठी माझ्या मराठी चित्रपटसृष्टीनं ज्या टाळ्या वाजवल्या, त्या अनमोल आहेत”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
आता अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करीत तुम्ही दोघी आमच्या लाडक्या अभिनेत्री आहात, असे म्हटले आहे. तर काहींनी तिच्या जारण चित्रपटातील अभिनयाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिच्या असेन मी नसेन मी नाटकातील भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अमृता सुभाष नाटक, मराठी-हिंदी चित्रपट याबरोबरच अनेक वेब सीरीजमध्येदेखील दिसली आहे. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून आणि प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ कोठारे दिग्दर्शित’पाणी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार वैदेही परशुरामी आणि प्राजक्ता माळीला मिळला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेते महेश मांजरेकर यांना मिळाला. महेश मांजरेकर यांना पुरस्कार देताना तब्बू मराठीतून व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.