मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणून आनंद इंगळे यांना ओळखलं जातं. ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाटकामुळे त्याच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ आणि ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटामुळे सध्या ते सर्वत्र चर्चेत आहेत. आनंद इंगळे यांनी अलीकडेच ‘मित्रम्हणे’ पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी टेलिव्हिजन, सिनेमा, सोशल मीडिया अशा सगळ्याच माध्यमांबद्दल आपली स्पष्ट मतं मांडली.
सौमित्र पोटेंच्या मुलाखतीत आनंद इंगळे यांना सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल त्यांचं मत काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेते म्हणाले, “अलीकडचा सिनेमा प्रचंड बदलला आहे. कारण, काम करणारी पिढी सुद्धा तुफान हुशार आहे. आजच्या काळातला सिनेमा हा जास्त हुशार आहे. आजही माझा असा दावा आहे की, आपल्याकडे सिनेमात जेवढे विषय येतात त्याला प्रेक्षकांची साथ लाभत नसेल पण, आपल्या सिनेमांचे विषय हे खरंच खूप छान असतात. तरुण मुलं इतक्या सुंदर स्क्रिप्ट घेऊन येतात, त्यावर लिखाण करतात मग, चित्रपटासाठी काम करतात खरंच सिनेमात खूप बदल झालाय.”
आनंद इंगळे पुढे म्हणाले, “पूर्वी असं नव्हतं…आज बोलायला हरकत नाही. तो एक विशिष्ट काळ होता…त्यावेळी फक्त दोन मित्र घ्यायचे आणि घाणेरडी कॉमेडी करून गलिच्छ सिनेमा करायचा, असं होतं. मला मुद्दाम त्यांची नावं घ्यायची नाहीत. त्यामुळे त्यांच्या घर-गाड्या झाल्या मी त्याबद्दल काहीच बोलणार नाही. पण, त्यांनी वाट लावली.”
“आधी कोणीतरी दोघेजण होते, मग नंतर आणखी दोन जण आले. अच्छा वच्छा करून चालू होतं काहीतरी… मग लोक का नाही कंटाळणार? यामुळेच मला स्मिता तळवलकरसारख्या बाईंचं कौतुक करावंसं वाटतं. कारण, त्या प्रचंड लाटेत सुद्धा त्या बाईने अत्यंत वेगळ्या प्रकारचे सिनेमे केले” असं मत अभिनेते आनंद इंगळे यांनी मांडलं.
दरम्यान, आनंद इंगळे यांनी यापूर्वी छोट्या पडद्यावरील ‘कुंकू’, ‘शेजारी – शेजारी’ या मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी असंख्य नाटकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय नुकतेच ते ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांच्याशिवाय सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती.