Ashok Saraf & Nivedita Saraf 36th Marriage Anniversary : मनोरंजनसृष्टीतील आदर्श व एव्हरग्रीन जोडी म्हणून अशोक व निवेदिता सराफ यांना ओळखलं जातं. ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या सेटवर जुळलेले यांच्या मनाचे बंध पुढे जाऊन लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले. या दोघांच्या सहजीवनाच्या प्रवासाला आज ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने निवेदिता यांनी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या पोस्टसह अभिनेत्रीने त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही जुने फोटो देखील चाहत्यांसह शेअर केले आहेत.

अशोक व निवेदिता यांचा लग्नसोहळा गोव्यात पार पडला होता. यावेळी निवेदिता यांचा भाऊ म्हणून अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अशोक सराफ यांचा कान पिळला होता. या आदर्श जोडप्याच्या सहजीवनाला आज ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अशोक व निवेदिता सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

निवेदिता सराफ लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत लिहितात, “आमच्या लग्नाला आज ३६ वर्षे पूर्ण झाली… हा प्रवास खरंच खूप सुंदर होता. वर्षे अशीच निघून गेली पण, आजही तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मला खास वाटतो. माझा सर्वात चांगला मित्र झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या बेस्ट नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

निवेदिता यांनी शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आजच्या पिढीसाठी तुमची जोडी मोठा आदर्श आहे”, “असेच कायम एकमेकांवर प्रेम करत राहा”, “तुमचे फोटो पाहून नकळत डोळे पाणावले किती सुंदर…नव्या पिढीसाठी दोघंही आदर्श आहात” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी निवेदिता यांनी शेअर केलेल्या पोस्टवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक व निवेदिता सराफ हे दोघंही सध्या छोट्या पडद्यावर काम करत आहे. अशोक सराफ ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर, निवेदिता सराफ ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहेत.