काही दिग्गज कलाकारांच्या कामांची चर्चा वर्षानुवर्षे आणि पिढ्यान् पिढ्या होत असते. दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख(Ranjana Deshmukh) या त्यापैकी एक आहेत. ‘एक डाव भुताचा’, ‘असला नवरा नको गं बाई’, ‘झुंज’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘बिनकामाचा नवरा’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली. आता अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांनी एका मुलाखतीत रंजना देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले आहे. रंजना देशमुख यशस्वी का झाल्या, यावरही त्यांनी वक्तव्य केले आहे.

तेव्हा तुम्ही यशस्वी…

अशोक सराफ यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती? त्यावर बोलताना अशोक सराफ म्हणाले, “खरं सांगायचं, तर माझी चांगली जोडी रंजनाबरोबर जमली होती. ती एक उत्कृष्ट कलाकार होती. एखादी गोष्ट आपल्याला जमत कशी नाही, ती गोष्ट मी करणार हा तिचा ध्यास असायचा. एवढा जेव्हा तुमचा ध्यास असतो, तेव्हा तुम्ही यशस्वी होता आणि म्हणून ती यशस्वी झाली. तिचे सुरुवातीचे चित्रपट मी पाहिलेले आहेत. का केलेत, असे वाटावे असे ते चित्रपट होते. नंतर तिने खूप सुधारणा केली. तिचे आणि माझे जास्त चित्रपट आलेत. त्या वेळेला तिची आणि माझी चित्रपटात जोडी जमली होती”, असे म्हणत अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्या कामाचे व एखादी गोष्ट शिकण्याच्या त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.

अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची ‘सुशीला’, ‘बिनकामाचा नवरा’ या चित्रपटांतील त्यांची जोडी लोकप्रिय ठरली. या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अशोक सराफ हे त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात. त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक सराफ हे सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेत त्यांची भूमिका ही शिस्तप्रिय, गंभीर स्वभाव असलेली दिसते. याबरोबरच, अशोक सराफ ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबरच वंदना गुप्ते, पुष्कराज चिरपुटकर, चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत.