Ata Thambaycha Naay : मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘देवमाणूस’, ‘मुक्ताई’, ‘झापुक झुपूक’ किंवा ‘सुशीला सुजीत’ असे नव्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे ती म्हणजे ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाची. बृहन्मुंबई महानगरपलिकेच्या सफाई कामगारांच्या आयुष्याच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. सर्व स्तरातून या चित्रपटाचं कौतुक होत आहे.
अशातच प्रसिद्ध मराठी लेखक क्षितिज पटवर्धनने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक शिवराज वायचळबरोबरचा फोटो त्याने शेअर केला आहे. यासह त्याने असं म्हटलं आहे की, “आपल्या आजूबाजूलाच असलेल्या पण आपण कधीच लक्ष न दिलेल्या माणसांची सुंदर गोष्ट पडद्यावर आणलीस यासाठी तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. कचराही वेगवेगळा करू न शकणारा; पण माणसांना झटक्यात वेगवेगळं करणारा समाज आपण रोज अनुभवतो. पण त्याच्यावर कधी चित्रकाराच्या हलक्या हातानं, तर कधी मजुराच्या कणखर दणक्यानं इतकं प्रभावी भाष्य केलं आहेस याचा आनंद आहे.”
यानंतर त्याने असं म्हटलं अहे की, “पेपरातल्या छोट्या वाटणाऱ्या कात्रणात अनेकांच्या जगण्याची भलीमोठी पुस्तकं दडलेली असतात. याचा प्रत्यय या चित्रपटात आल्यावाचून राहत नाही. त्यासाठी विशेष अभिनंदन. प्रभावी कथा, भिडणारे संवाद, (शिवराज, ओंकार, आणि अरविंद जगताप) सगळ्याच कलाकारांचा कसदार अभिनय (भरत जाधव लाजवाब. सिद्धार्थ जाधव अप्रतिम. प्राजक्ता, किरण, आशुतोष सर, पर्ण, ओम, प्रवीण, दीपक शिर्के, सागरचं काम केलेला अभिनेता) जबरदस्त शीर्षक गीत आणि मन व डोळे भरून टाकणारा शेवट या सगळ्या जमेच्या बाजू.”
यापुढे क्षितिज चित्रपटाविषयी असं म्हणतो की, “चित्रपट अजून खोलात शिरू शकला असता असं वाटलं; पण उघड्या ड्रेनेजकडे फक्त डोकावून पाहणाऱ्या माझ्यासारखा माणसांनां आत एक माणूस असू शकतो आणि त्याला आयुष्य असू शकतं, स्वप्न असू शकतात, इतकी जाणीव करून दिलीस तीही काही कमी नाही.” यानंतर त्याने निर्माते तुषार, झी स्टुडिओज आणि बवेश सर यांचे कौतुक करत “नवे आवाज, नवे विचार यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार” असं म्हटलं आहे.
दरम्यान, उद्या म्हणजेच १ मे रोजी कामगार दिनानिमित्त ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. शिवाय अनेकजण या चित्रपटाविषयी गौरवोद्गार काढत आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास किती यशस्वी होईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.