केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. सहा अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ३० जून २०२३ रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अवघ्या काही दिवसांमध्येच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.
हेही वाचा : आशा भोसले: चितरतरूण आवाजाचं गारूड!
चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने-कुलकर्णी, दीपा परब-चौधरी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सहा अभिनेत्रींच्या अभिनयाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचं प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. ‘बाईपण भारी देवा’च्या या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या केदार शिंदे यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केदार शिंदे लिहितात, “एक लांबलचक सुट्टी घेतोय या इन्स्टाग्रामवरून…तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं. पण, खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं, नव्या विचारांसाठी… बाय फॉर नाऊ!” अर्थातच मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या या लोकप्रिय दिग्दर्शकाने इन्स्टाग्रामवरून ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. आगामी प्रोजेक्ट्स आणि नव्या चित्रपटांचं काम यासाठी केदार शिंदेंनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : “माझ्यामुळे आदित्य ठाकरेचं…”, अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “त्याच्या विरोधात…”
दरम्यान, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होणार म्हणून केदार शिंदे इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले होते. परंतु, मार्चच्या सुरुवातीला त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. त्यामुळे ते नवं अकाऊंट ओपन करून प्रेक्षकांच्या संपर्कात राहिले होते. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचं फेसबुक अकाऊंट सुद्धा हॅक झालं होतं.